देशभरात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान काही राज्य परिस्थितीप्रमाणे निर्बंध शिथील करत असून ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही करोनाने थैमान घातलं असून कंटनेमेंट झोनमध्ये लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व कंटनेमेंट झोनमध्ये १९ जुलैपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे.

९ जुलै रोजी सुरु झालेला हा लॉकडाउन सात दिवसांसाठीच जाहीर करण्यात आला होता. दरम्यान गृहविभागाने नवं परिपत्रक प्रसिद्ध केलं असून कंटेनमेंट झोनमध्ये १५ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “९ जुलैपासून सर्व नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केली जात आहे. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी सरकारी तसंच खासगी कार्यालयात उपस्थित लावण्यास प्रतिबंध आहे”.

स्थानिक प्रशासन जीवनाश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी प्रयत्न करेल असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या ६०६ कंटेनमेंट झोन आहेत. राज्यात करोनाचे ३२ हजार ८३८ रुग्ण आहेत. तर ९८० जणांचा मृत्यू झाला आहे.