C V Anand Bose : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम एक महिना बाकी राहिला असताना पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे पश्चिम बंगालमधील विविध शहरांतील दौरे, सभा, मेळावे जोरात सुरू आहेत. या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
असं असतानाच आज पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सी.व्ही.आनंद बोस यांनी जवळपास साडेतीन वर्षे पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सी.व्ही.आनंद बोस यांनी आपल्या राज्यपाल पदाचा अचानक राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला असल्याचं समोर आलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा का दिला? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं?
“पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांच्या अचानक राजीनाम्याच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मी खूप चिंतेत आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील कारणं मला माहिती नाहीत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आगामी राज्य विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काही राजकीय हितसंबंधांसाठी राज्यपालांवर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दबाव आला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला नुकतंच कळवलं की आर.एन.रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी या संदर्भात परंपरेनुसार कधीही माझ्याशी सल्लामसलत केली नाही. अशा कृती भारतीय संविधानाच्या आत्म्याला कमकुवत करत आहेत. केंद्राने सहकारी संघराज्याच्या तत्त्वांचा आदर केला पाहिजे आणि लोकशाही परंपरा आणि राज्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे एकतर्फी निर्णय घेण्यापासून दूर राहिलं पाहिजे”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
