देशातील करोनाचा जोर ओसरत असला तरी राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेतनाही. सत्ताधारी आणि विरोधक आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यात करोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. करोना लस घेतल्यानंतर कोविन अ‍ॅपवरून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत असल्याने भाजपाविरोधी राज्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये करोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी १८-४४ वयोगटातील नागरिकांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो असणारं प्रमाणपत्र मिळणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्याने दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

“…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा!

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप

भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तृणमूल काँग्रेस पंतप्रधानपदाचा मान ठेवत नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावू शकते तर आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो का लावू नये? असा प्रतिप्रश्न तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

रामदेवबाबांच्या कोरोनिलचा करोना कीटमध्ये समावेश करणं ही ‘मिक्सोपॅथी’, IMAने नोंदवला आक्षेप

लस तुटवड्यावरून साधला निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. लशींच्या तुटवड्यावरुन त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं होतं. राज्यांना लस उपलब्ध होत नसताना संपूर्ण देशाचं डिसेंबरपर्यंत लसीकरण कसं करणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लस दिली पाहीजे असंही सांगितलं होतं. “केंद्र सरकार खूप काही सांगते. पण तसं होत नाही. वचनबद्धता असली पाहीजे. लस संपूर्ण देशाला पुरवणं मोठं काम आहे. राज्यांना लस पुरवू शकत नाहीत. तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचं लसीकरण कसं करणार?”, असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता.