लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणार्या पश्चिम बंगालमध्ये पंधरा वर्षांनंतर ‘परिवर्तना’चे संकेत बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजातून व्यक्त होत आहेत. ७ पैकी ५ चाचण्यांनी भाजप बहुमताचा जादूई आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी, दोन चाचण्यांनी मात्र सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्यांदा सत्ता राखणार की, परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देत जनता भाजपकडे सत्ता सोपवणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बंगाली अस्मिता, महिलांचे हक्क, लोकप्रिय योजना, मतदार फेरतपासणी मोहीम, बंगालबाहेरील पक्षाची (भाजप) घुसखोरी अशा मुद्द्यांवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. तर, भाजपला यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेची संधी दिसू लागली आहे.
तृणमूल काँग्रेसची कथित गुंडगिरी, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, राम-दुर्गा अशा मुद्द्यांभोवती भाजपचा प्रचार केंद्रित झाला होता. भाजपने बंगाली मतदारांना परिवर्तनाची हाक दिली होती. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दोन्ही टप्प्यांत मिळून ९० टक्के इतके प्रचंड मतदान झाले असून मतांच्या वाढीव टक्क्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. भाजपला सत्ता मिळाली तर पश्चिम बंगालमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होऊ शकेल. ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

केरळमध्ये डाव्यांना डच्चू
पश्चिम बंगालबरोबर आसाम, तमिळनाडू, केरळ व पुद्दुचेरी या राज्यांतही निवडणूक झाली असून त्यापैकी केरळमध्ये दहा वर्षांची ‘माकप’च्या डाव्या आघाडीची सत्ता खालसा होऊन काँग्रेसच्या ‘यूडीएफ’ आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये भाजपला जास्तीत जास्त ५ जागा मिळू शकतील, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीतून व्यक्त झाला आहे. ‘माकप’ सत्तेवरून पायउतार झाला तर देशातील डाव्यांची सत्ता असलेले एकमेव राज्यही हातातून जाईल.
आसाममध्ये भाजपच्या हिमंतांची सरशी
आसाममध्ये भाजप तिसर्यांदा सत्तेत येऊ शकेल, असे सर्व मतदानोत्तर चाचण्याचे अंदाज सांगतात. मुख्यमंत्री (पान ४ वर) (पान १ वरून) हिमंत बिस्वा-शर्मा यांच्या कडव्या ध्रुवीकरणाच्या प्रचारानंतर भाजप आसाममधील वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी होण्याचा अंदाज आहे. आसाममध्ये मतदारसंघांच्या वादग्रस्त फेररचनेनंतर झालेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामध्ये मुस्लीमबहुल मतदारसंघांची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप होता. भाजपला इथे दोनतृतीयांश बहुमत मिळण्याची शक्यता आहे. आसामप्रमाणे पुडुचेरीमध्येही भाजप आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता आहे.
तामीळनाडूत ‘द्रमुक’च पण, अभिनेता विजय निर्णायक
तामीळनाडूमध्येही सलग दुसर्यांदा ‘द्रमुक’ला सत्ता राखण्यात यश मिळण्याची शक्यता असली तरी जागांमध्ये घट होऊ शकते. द्रमुकच्या मतांचा टक्का आणि जागांचा राजकारणात पदार्पण करणार्या अभिनेता विजयच्या ‘टीव्हीके’ पक्षाकडे वळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तामीळनाडूच्या विधानसभा निवडणुकीतील विजय निर्णायक ठरेल. द्रविडी अस्मिता जपणार्या तामीळनाडूमध्ये विजय सत्तास्पर्धेतील मोठा घटक ठरू शकेल. मतदानोत्तर चाचण्यांनी ‘टीव्हीके’ला सुमारे १६-४० जागा मिळण्याचा अंदाज असून ‘ॲक्सीस माय इंडिया’ने मात्र ‘टीव्हीके’ला तब्बल १२० जागादेखील मिळू शकतात असे भाकित केले आहे. राज्यातील नेतृत्वहिन ‘अण्णाद्रमुक’ला विरोधी बाकांवर बसावे लागेल.
दुसर्या टप्प्यातही ९१ टक्क्यांवर मतदान
नवी दिल्ली: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दोन्ही टप्प्यात मिळून ९२.४७ टक्के मतदान झाले. स्वातंत्र्यानंतरचा हा विक्रम आहे. बुधवारी दुसर्या टप्प्यात ९१.६६ टक्के मतदान झाले. अर्थात ही आकडेवारी अंतिम नव्हती. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी २०११ मध्ये सर्वाधिक ८४.७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी महिलांच्या मतदानाची टक्केवारी ९३.२४ इतकी होती तर ९१.७४ टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या राज्यातील एकूण २९४ जागांपैकी दुसर्या टप्प्यात १४२ जागा होत्या.
