पीटीआय, कोलकाता
मालदा जिल्ह्यातील सात न्यायालयीन अधिकार्यांच्या घेराव प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोन व्यक्तींना पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी सिलिगुडीच्या बागडोगरा विमानतळावरून अटक केली. ॲड. मोफक्करुल इस्लाम असे या मुख्य सूत्रधाराचे नाव असून, तो विमानात बसण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
मोफक्करुल हा उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारचा रहिवासी असून सध्या तो कोलकात्यात राहत होता. बुधवारी स्थानिकांना प्रक्षोभक भाषण करून उकसवल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध कलिचौक पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या भाषणानंतर मोठाबारी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणार्या कलिचौक -२ बीडीओ कार्यालयात सात न्यायालयीन अधिकार्यांना घेराव घालण्यात आला होता.
‘घटनेनंतर आम्ही मोफक्करुल इस्लामचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आणि पश्चिम बंगाल गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) व सिलिगुडी पोलिसांच्या मदतीने त्याला आणि त्याच्या सहकार्यांना बागडोगरा विमानतळावरून पकडले,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (उत्तर बंगाल) के. जयरामन यांनी पत्रकारांना दिली. कालिचौक घटनेप्रकरणी आतापर्यंत एकूण १९ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एका भारतीय धर्मनिरपेक्ष आघाडीच्या (आयएसएफ) उमेदवारासह एकूण ३५ जणांना अटक केली आहे.
‘घेरावाला एमआयएम, आयएसएफ जबाबदार’
घेरावाला ‘एमआयएम’ आणि ‘आयएसएफ’ला जबाबदार असून, काँग्रेस आणि भाजपने चिथावणी दिल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. मुख्य सूत्रधाराला राज्याच्या ‘सीआयडी’ने अटक केली आहे. ही पोलीस संस्था अजूनही माझ्याच नियंत्रणाखाली आहे, निवडणूक आयोगाच्या नाही, असेही ममता यांनी सांगितले.
‘एनआयए’ दाखल
घटनेच्या तपासासाठी ‘राष्ट्रीय तपास संस्थे’च्या (एनआयए) एका पथकाने मालदा येथील मोथाबारी आणि कालिचौक पोलीस ठाण्यांना भेट दिली. ‘डीआयजीं’च्या नेतृत्वाखालील या २४ सदस्यीय पथकाने पोलीस आणि इतरांशी चर्चा केली. तसेच, घटनेच्या ठिकाणाहून नमुनेही गोळा केले.
