Mamata Banerjee X Bio Change after Suvendu Adhikari becomes West Bengal CM: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मोठ्या पराभवाचा सामना कराव्या लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र आता याच्या काही दिवसांनंतर बॅनर्जी यांनी त्यांच्या एक्स हँडलच्या बायोमध्ये बदल केला आहे. या बदलाच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारमधील आपला कार्यकाळाची संपल्याचे मान्य केल्याचे दिसून येत आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नव्या बायोमध्ये लिहिले आहे की, “संस्थापक अध्यक्षा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (१५ वी, १६ वी आणि १७ वी विधानसभा).” तर यापूर्वी त्यांचा जुना बायो “संस्थापक अध्यक्षा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. माननीय मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल,” असा होता.
ममता बॅनर्जी यांचे कधीकाळी सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारी यांनी बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. अधिकारी हे पश्चिम बंगालचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने बंगाल निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत टीएमसीचे दीर्घकाळापासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.
ममता बॅनर्जी या २०११ साली डाव्या पक्षांना सत्तेतून खाली खेचत मुख्यमंत्री बनल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी सलग तीन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण २०२५ मध्ये त्यांच्या पक्षाला मोठा झटका बसला असून टीएमसीचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

सुवेंदू अधिकारी कोण आहेत?
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे.
या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखले जाते. अधिकारी कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. पण, ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अधिकारी कुटुंब या पक्षात सामिल झाले. सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सूवेंदू अधिकारी यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
