पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर लागोपाठ हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. तृणमूलचे सर्वेसर्वा आणि दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाने हल्ला केल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात हल्ला झाला. हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे ही घटना घडली.

आंदोलनादरम्यान अचानक दगडफेक

खासदार कल्याण बॅनर्जी हे ‘श्रीरामपूर’ लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. आपल्याच बालेकिल्ल्यात काल झालेल्या अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याण बॅनर्जी समर्थकांसह चंडीतला येथे आंदोलन करत होते. ते रस्त्यावरून पायी चालत जात असताना, अचानक मागून आलेल्या एका वस्तूने त्यांच्या डोक्याला जोरदार धडक दिली. त्यांच्यावर क्रिकेटचा चेंडू किंवा मोठा दगड फेकण्यात आला. हा घाव इतका गंभीर होता की कल्याण बॅनर्जी यांनी डोके पकडले आणि ते थेट रस्त्यावर कोसळले. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डागही दिसून आले. याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

‘चोर-चोर’च्या घोषणा आणि काळे झेंडे

हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. कल्याण बॅनर्जी यांना पाहून काही आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा दिल्या आणि त्यांना काळे झेंडेही दाखवले. आदल्या दिवशी सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांनाही अशाच प्रकारच्या जनआक्रोशाचा सामना करावा लागला होता.

भाजपवर आरोप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा

या हल्ल्यावरून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट भाजपवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हा कोणताही जनआक्रोश नव्हता. भगवी वस्त्रे घातलेल्या १५-२० भाजपच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला शिवीगाळ केली आणि माझ्या डोक्यावर दगड मारला, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला.”

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक बाब म्हणजे, कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेनंतर स्वतःच्याच राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “हल्ला झाला तेव्हा बंगाल पोलीस मूकप्रेक्षक बनून उभे होते. मला एका केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवले,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, “राज्यात पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, हा माझा खून करण्याचा प्रयत्न होता. विरोधी आवाज दाबण्यासाठी खुद्द मुख्यमंत्रीच हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत,” असा खळबळजनक आरोपही केला.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या लागोपाठच्या घटनांमुळे पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.