पश्चिम बंगाल : राज्यपालांच्या बैठकीतून भाजपाचे ७४ पैकी २४ आमदार ‘गायब’; तृणमूलमध्ये ‘घरवापसी’चे प्रयत्न सुरु?

मागील आठवड्यामध्ये मुकुल रॉय यांनी भाजपामधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज आहे

Modi vs Mamata, West Bengal
राज्यपालांना भेटण्यासाठी भाजपाच्या ७४ पैकी ५० आमदारच उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये भाजपामधून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये होणारी घरवापसी रोखण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये भाजपाला फारसं यश येताना दिसत नाहीत. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपाचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या आमदारांच्या एका प्रतिनिधिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

२४ आमदार गैरहजर

भाजपा नेत्यांनी राज्यपालांसोबत घेतलेल्या बैठकीचा हेतू बंगालमध्ये सुरु असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती राज्यपालांना देण्याचा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा होता. मात्र भाजपाच्या ७४ पैकी २४ आमदार यावेळी गैरहजर होते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपामध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का अशापद्धतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्याने भाजपामध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचही सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> West Bengal Election: “पराभवानंतर मोदी, शाहांनी राजीनामा द्यावा, या निकालाचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीवरही होईल”

इतर अनेक नेते घरवापसीच्या मार्गावर

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाने अनेक आमदारा नाराज असून काहीजण तृणमूलच्या संपर्कात आहेत. अनेक भाजपा आमदार पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केलीय. मागील आठवड्यामध्ये मुकुल रॉय यांनी भाजपामधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासहीत इतर अन्य नेते सुद्धा लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जातोय. मुकुल रॉय यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली असून त्यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

नक्की वाचा >> पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

ममता यांनी आधीच केलं स्पष्ट

दुसरीकडे मुकुल यांच्यासोबत तृणमूल सोडणाऱ्या आणि आता पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाकडून पुन्हा सकारात्मक विचार केला जाईल असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधीच स्पष्ट केलं आहे. ३० हून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. रॉय यांच्या आधी सोनाली गुहा आणि दीपेंदु बिस्वाससारख्या नेत्यांनी थेट समोर येत तृणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्री बॅनर्जी यांची माफी मागितली होती.

नक्की पाहा >> Election Results: “बंगालमध्ये भाजपाचा कोब्रा भाजपालाच डसला वाटतं”; मिथुन चक्रवर्तींवरील Memes Viral

अधिकारी यांनी केला पक्षांतर कायद्याचा उल्लेख

अधिकारी यांनी सोमवारी मुकुल रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा नाही दिला तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतर कायद्याअंतर्गत रॉय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज करु असं म्हटलं आहे. रॉय यांचा थेट उल्लेख न करता अधिकारी यांनी, “कृष्णानगर उत्तर मतदारसंघातील आमदाराने पक्षांतर केलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील. जर त्यांनी उद्यापर्यंत राजीनामा नाही दिला तर आम्ही बुधवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करु,” असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “तृणमूलच्या CM, MP, आमदारांनाही दिल्लीत यावं लागतं हे लक्षात ठेवा”; भाजपा खासदाराचा इशारा

…तर सल्ला घेणार

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद या प्रकरणाकडे लक्ष ठेऊन असल्याची माहितीही अधिकारी यांनी दिली. या दोघांचा सल्ला घेऊन मुकुल रॉय यांच्याविरोधातील कायदेशीर लढाईबद्दल निर्णय घेतला जाईल असं अधिकारी म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: West bengal politics missing bjp mlas at suvendu adhikari governor meet sparks migration concern scsg

ताज्या बातम्या