पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला मोठा धक्का दिला. मात्र, टीएमसीच्या पराभवानंतर भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याने अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढंच नाही तर या निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता या हिंसाचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आल्याची माहिती बंगालच्या प्रभारी पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

पश्चिम बंगालच्या प्रभारी पोलीस महासंचालकांनी काय सांगितलं?

“गेल्या ४८ तासांत संपूर्ण बंगालमध्ये ४०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच जवळपास १,१०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यापासून धमक्या, हल्ले आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आतापर्यंत २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ४३३ जणांना अटक केली आहे”, अशी माहिती बंगालचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सिद्ध नाथ गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.

पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन

“काही व्यक्तींविरुद्ध तक्रारी असू शकतात. जर असतील तर तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याची गरज नाही. नागरिकांनी शांतता, सलोखा आणि सुव्यवस्था राखण्याची गरज आहे”, असं आवाहन बंगालच्या पोलीस महासंचालकांनी केलं आहे.

कोलकाता पोलीस आयुक्तांनी काय म्हटलं?

कोलकाता पोलीस आयुक्त अजय कुमार नंद यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले की, “कोलकाता पोलिसांच्या हद्दीत आतापर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या ८० जणांपैकी ६५ जणांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे, तसेच उर्वरित १५ जणांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक करण्यात आली आहे. दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये”, असं अजय कुमार नंद यांनी सांगितलं.

पोलीस महानिरीक्षकांनी काय सांगितलं?

पोलीस महानिरीक्षक (बारासात) अमित पी.जावलगी यांनी म्हटलं की, “जिल्ह्यातील एका गावातील काही घरांची मंगळवारी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. काही सीएपीएफ जवान किरकोळ जखमी झाले आहेत. एक महिला कॉन्स्टेबलही जखमी झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलं. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि सर्वजण घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरितांवरही कारवाई करण्यात येईल. काही भागांमध्ये बॉम्ब सापडले असून आम्ही ते जप्तही केले आहेत. आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे”, असं अमित पी.जावलगी यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे?

पश्चिम बंगालच्या प्रभारी डीजीपींच्या मते राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) ५०० तुकड्या तैनात आहेत. त्याशिवाय ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमच्या सुरक्षेसाठी आमच्याकडे सीएपीएफच्या आणखी २०० तुकड्या तैनात आहेत. सध्या आमच्याकडे सीएपीएफ तुकड्यांची संख्या पुरेशी आहे.

भाजपाने काय प्रतिक्रिया दिली?

निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या वृत्तांदरम्यान भाजपाने बुधवारी सांगितलं की, पक्षाने ठरवल्याशिवाय कोणीही पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करू शकत नाही. कोणीही स्वतःहून भाजपा सदस्य म्हणून घोषित करू शकत नाही, जोपर्यंत पक्ष तुम्हाला औपचारिकपणे स्वीकारत नाही”, असं भाजपाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपा आमदार सौमित्र खान यांनी म्हटलं की, “सकाळी टीएमसीमध्ये असलेले काही लोक संध्याकाळपर्यंत भाजपामध्ये गेले आणि भाजपाप्रती आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा सर्व हिंसाचार सुरू केला. आम्हाला आणखी २-४ तास द्या, आम्ही सर्व काही ठीक करू. आमच्या पक्ष नेतृत्वाने पोलिसांना या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत”, असं त्यांनी म्हटलं.