पीटीआय, कोलकाता
“पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस निष्क्रिय राहिले,” असे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी कलकत्ता उच्च न्यायालयाला सांगितले. राज्यामध्ये बेकायदा बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा संदर्भ देत, “पश्चिम बंगाल हे बुलडोझर राज्य नाही,” असेही त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यापूर्वी राज्यातील ‘एसआयआर’ प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात निवेदन देण्यासाठी वकील या नात्याने स्वतः हजर राहिल्या होत्या. त्यानंतर न्यायालयात हजर राहण्याची गुरुवारी त्यांची दुसरी वेळ होती. निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि कार्यालयांवर हल्ले झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी बॅनर्जी यांनी केली.
ममता बॅनर्जी यांच्याबरोबर तृणमूलचे ज्येष्ठ नेते चंद्रिमा भट्टाचार्य आणि कल्याण बॅनर्जी हे होते. हे दोघेही वकील आहेत. कल्याण बॅनर्जी यांचा मुलगा आणि उत्तरपारा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले श्रीसन्य बंदोपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी ममता बॅनर्जी या वकिलाचा पोशाख परिधान करून कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाल्या.
निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे किमान १० कार्यकर्ते मारले गेले, पक्षाच्या १५० ते १६० कार्यालयांची मोडतोड करण्यात आली आणि देशभरात हिंसाचाराच्या सुमारे दोन हजार घटना घडल्या, असे ममता बॅनर्जी यांनी मुख्य न्यायाधीश सुजॉय पाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला सांगितले. परिस्थिती इतकी वाईट आहे की, आपल्यालाही तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये जाणे शक्य होत नसल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.
‘बीसीआय’चे निर्देश
ममता बॅनर्जी यांनी वकील म्हणून केलेली नोंदणी आणि व्यावसायिक दर्जा याबाबत ४८ तासांच्या आत तपशीलवार अहवाल द्यावा, असे निर्देश बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) पश्चिम बंगाल बार कौन्सिलला दिले. ममता बॅनर्जी यांनी एलएलबीचे शिक्षण घेतलेले आहे. प्रचलित पद्धतीनुसार, घटनात्मक पदावरील व्यक्ती किंवा पगारदार कर्मचाऱ्याचा वकिलीचा परवाना रद्द करावा लागतो आणि पुन्हा वकिली करण्यासाठी हा परवाना पुन्हा मिळवावा लागतो.
मरण पावलेल्या १०पैकी सहा हिंदू आहेत. कृपया पोलिसांना योग्य ती कार्यवाही करायला सांगा. ते एफआयआर नोंदवून घेत नाहीत. माझ्या कुटुंबामध्ये १२ वर्षांच्या मुलींना बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. – ममता बॅनर्जी, अध्यक्ष, तृणमूल काँग्रेस</strong>
