पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये मतदान झाल्यानंतर विविध जिल्ह्यांत हिंसाचाराच्या घटना उघकीस आल्या आहेत. दक्षिण चोवीस परगणा, उत्तर २४ परगणा, मालदा, मुर्शिदाबाद येथे हिंसक घटना घडल्या. दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस व आयएसएफ यांच्यात हाणामारी झाली. तर मुर्शिदाबाद येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार प्रतिनिधी राहुल अमीन यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसला यासाठी पक्षाने जबाबदार धरले.

मालदा येथे भाजप नेता हल्ल्यात गंभीर जखमी झाला. तृणमूल काँग्रेस भाजप कार्यकर्त्याना लक्ष्य करत असल्याचा आरोप भाजप नेते खेगन मुर्मू यांनी केला. १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान गैरप्रकाराच्या आरोपांनंतर पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर दोन मे रोजी फेरमतदान होईल. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदानादरम्यान हे गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. यात मगरहाट पश्चिम मतदारसंघात ११ तर डायमंड हार्बर मतदारसंघात चार ठिकाणी फेरमतदान होईल. फाल्टा विधानसभा मतदारसंघातील अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.

अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदान केंद्राबाहेर गुरुवारी आंदोलन केले होते. त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात मतमोजणीपूर्वी घोटाळा करण्याचा प्रयत्न असल्याचा ममतांचा आरोप आहे. मात्र मतदान केंद्रांवर घोटाळा होण्यास कोणताही वाव नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे घोटाळ्याचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले.