पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीत पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून ५० कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली होती. हे पैसे आपल्या गैरहजेरीत घरात ठेवण्यात आल्याचा आरोप मुखर्जी यांनी केला आहे. या पैशांशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी ३ ऑगस्टपर्यंत ईडीच्या ताब्यात आहेत. शिक्षण खात्यातील ‘क’ आणि ‘ड’ गटातील कर्मचारी, नववी आणि बारावीच्या साहाय्यक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा केल्याचा चॅटर्जींवर आरोप आहे. दरम्यान, ईडीकडून या घोटाळ्यासंदर्भात आणखी चार ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फोर्ट ओसीस सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये ही छापेमारी करण्यात येत आहे. अर्पिता मुखर्जींच्या चौकशीदरम्यान या फ्लॅटसंदर्भातील काही कागदपत्रे आणि माहिती मिळाल्यानंतर ईडीकडून या फ्लॅटची झाडाझडती घेण्यात येत आहे.

ईडीने २२ जुलैला पहिल्यांदा अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरावर छापेमारी केली होती. यावेळी तब्बल २१ कोटी ९० लाखांची रोख जप्त करण्यात आली होती. ५६ लाख किमतीचे परकीय चलन आणि ७६ लाखांचे सोनेही ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्पिता यांच्या एका दुसऱ्या घरातील छापेमारीत २८ कोटी ९० लाखांच्या रोख रकमेसह पाच किलो सोनं आणि काही दस्तावेज ईडीने हस्तगत केले होते. या पैशांशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ही रक्कम शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आहे.

ते माझे पैसे नाहीच – पार्थ चॅटर्जी

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या पैशांशी काहीही संबंध नसल्याचे पार्थ चॅटर्जी यांनी देखील म्हटले आहे. वेळ आल्यावर माझ्याविरोधात हे कटकारस्थान कोणी केले, हेही कळेल असा दावा त्यांनी केला आहे. या घोटाळ्याशी निगडित कुठल्याही व्यवहारांमध्ये सामील नसल्याचे स्पष्टीकरणही चॅटर्जी यांनी दिले आहे. दरम्यान, हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तृणमुल काँग्रेसने चॅटर्जी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली आहे.