AIMIM breaks alliance following the Humayun Kabir sting operation and alleged BJP deal exposed by TMC : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसने एक कथित स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, ज्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टीबरोबरची आपली युती तोडली आहे. या व्हिडीओमध्ये टीएमसी पक्षातून निलंबीत करण्यात आलेले हुमायून कबीर हे पश्चिम बंगालमधील मुस्लिमांबद्दल वादग्रस्त दावे करताना आणि त्यांच्या भाजपाबरोबरच्या कथित संबंधांबद्दल बोलताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्याने निवडणुकीच्या तोंडांवर बंगलच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने एक पत्रकार परिषद घेत असाही आरोप केला आहे की, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आखलेल्या अनेक कोटींच्या प्लॅनमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा देखील सहभाग होता.

गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमधून निलंबीत करण्यात आल्यानंतर कबीर यांनी ‘आम जनता उन्नयन पार्टी’ नावाने नवीन पक्ष स्थापन केला आहे. दरम्यान कबीर यांनी हा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी टीएमसी नेतृत्वावर आपली बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक मोहीम राबवत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी ते टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओमध्ये काय आहे?

तृणमूल काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, कबीर कथितरित्या असा दावा करताना ऐकू येत आहेत की, ते पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात होते आणि त्यांना विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपाचे शासन असलेल्या राज्यांतील नेत्यांशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले होते.

तृणमूल काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कबीर यांनी मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये ‘मुस्लिमांना मूर्ख बनवणे सोपे आहे’ असे सूचित करणारे कबीर यांचे कथित विधान यासह, बाबरी मशीद प्रकरणाच्या संदर्भांसह कथितपणे अॅडव्हान्स फंडिंग म्हणून २०० कोटी रुपयांची मागणी करणे यांचा समावेश आहे.

कबीर हे निवडणुकीत भाजपाला फायदा पोहोचावा म्हणून अल्पसंख्याक समुदायाची मते तृणमूल काँग्रेसकडून दुसरीकडे कशी वळवता येतील याची रणनीतीदेखील सांगताना दिसत आहेत. तसेच पुढे ते १ हजार कोटी रूपयांच्या प्लॅनचा उल्लेख करताना ऐकू येत आहेत, त्यापैकी २०० कोटी रुपये अडव्हान्स म्हणून आधीच मिळाले असल्याचा दावाही त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडीओमधून समोर येत असलेल्या दाव्यांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. मात्र या व्हिडीओच्या सत्यतेची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.

हुमायून कबीर यांनी आरोप फेटाळले

कबीर यांनी हे सर्व आरोप फेटाळत, आपण नोव्हेंबर २०१९ पासून भाजपाच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसल्याचे म्हटले आहे. “जर ते कोणताही पुरावा, कोणताही फोटो दाखवू शकत असतील, तर त्यांनी दाखवावा,” असे कबीर म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि हिमंता बिस्वा सरमा यांची नावे घेत तृणमूल काँग्रेसला आव्हान दिले.

कबीर यांनी या बनावट स्टिंग ऑपरेशनच्या मागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अभिषेक बॅनर्जी, आणि पक्षाचे नेते कुणाल घोष आणि फिरहाद हकिम यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. “ते माझ्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत, म्हणून माझी बदनामी करण्यासाठी ते एआयचा वापर करत आहेत. मी त्यांच्याविरुद्ध मानहानीचे खटले दाखल करेन,” असे कबीर म्हणाले. तसेच या दाव्यांमुळे मुस्लिम समुदायाने आपली दिशाभूल करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

एमआयएमची युतीमधून माघार

दरम्यान या वादाचा लगेचच राजकीय प्रभाव पडल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ समोर आल्याबरोबर असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम पक्षाने कबीर यांच्या पक्षाबरोबरच्या युतीमधून माघार घेतली आहे.

एआयएमआयएमने एका निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिमांच्या विश्वासहा प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विधानांशी ते स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत. तसेच, त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली आहे.