मुंबई : केंद्रातील भाजप सकारच्या विरोधात दोन हात करण्याची क्षमता असणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्या ‘द्रमुक’चा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या दोन्ही पराभवांमुळे भाजपला वैचारिक तसेच अस्मितेच्या मुद्द्यांवर आव्हान देणार्‍यांचा आवाज क्षीण झाला.

केंद्रातील भाजपला आव्हान देण्याची हिंमत ममता बॅनर्जी व स्टॅलिन यांनी दाखविली होती. ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याची भाजपकडून एकही संधी सोडली जात नसे. त्यासाठी राजभवनाचाही खुबीने वापर करण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांनाही त्यांची जागा दाखवून दिली होती.

आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा भाजपने चांगलाच तापवला होता. त्यावरून ममता बॅनर्जी यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली होती. हा अपवाद वगळता ममता बॅनर्जी नेहमीच केंद्र व भाजपशी दोन हात करायच्या.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील यशाने भाजपची ताकद वाढली होती. पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड केले होते. मात्र या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी आता विरोधात बसावे लागणार आहे.

स्टॅलिन यांचाही आवाज बंद

  • ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तमिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाजपशी कायम संघर्ष केला. अगदी प्रचाराच्या काळात महिला आरक्षण विधेयक काळे कपडे घालून जाळत निषेध व्यक्त केला होता. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी संमती देण्याचे नाकारल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला.
  • हिंदी लादण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास स्टॅलिन यांनी नकार दिला होता. त्यासाठी केंद्राने दोन हजार कोटींचा निधी अडविला होता. हिंदी सक्तीवरून त्यांनी भाजपच्या विरोधात ठोस भूमिका घेतली होती. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच भाजपला त्यांनी आव्हान दिले होते. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाने स्टॅलिन यांचाही आवाज बंद झाला आहे.