पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी पदभार स्वीकारताच एक निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शाळा आणि मदरसांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारच्या या नव्या आदेशानुसार, आता दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठात संपूर्ण वंदे मातरम् गावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता पश्चिम बंगालमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा तीव्र आक्षेप
पश्चिम बंगाल सरकारच्या या नव्या नियमावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाने हा अध्यादेश ‘तातडीने मागे घ्यावा’ किंवा किमान ‘मुस्लिम विद्यार्थ्यांना या सक्तीतून सवलत देण्यात यावी’, अशी मागणी केली आहे. बोर्डाचे प्रवक्ते डॉ. एस. क्यू. आर. इलियास यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली, “कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या धार्मिक संकल्पनांच्या आणि विश्वासाच्या विरोधात जाणारे गीत किंवा मजकूर म्हणण्याची सक्ती करणे, हा थेट भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा संकोच आहे.”
‘…तर या देशात राहता येणार नाही’; मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आक्रमक
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या विरोधानंतर मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. “या देशात राहायचे असेल, तर वंदे मातरम् आणि जन गण मन म्हणावेच लागेल,” अशा कडक शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले, “प्रत्येक शाळेत वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही भारताची संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती आहे. हा देश हिंदुस्तान आणि इंडिया दोन्ही नावांनी ओळखला जातो. हा देश आपण इतर कोणाच्याही हातात जाऊ देऊ शकत नाही. तसेच प्रत्येकाला २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय दिनांचा आदर करावाच लागेल.”
केंद्र सरकारकडून सुवेंदु अधिकारी यांच्या निर्णयाचे समर्थन
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील सुवेंदु अधिकारी सरकारच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. वंदे मातरम् हे संपूर्ण देशाचे राष्ट्रीय गीत आहे, असे सांगत रिजिजू म्हणाले की, “हे गीत केवळ माझे, तुमचे, किंवा एखाद्या विशिष्ट राज्याचे किंवा धर्माचे नाही. हे आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत आहे आणि या विषयावर राजकारण करण्यासाठी अजिबात जागा नसावी.”
शशी थरूर यांच्या विधानामुळे नवीन चर्चा
दरम्यान, या संपूर्ण वादात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका विधानामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. अधिकृत कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘वंदे मातरम्’ची पाचही कडवी गाण्याच्या सक्तीवर थरूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही पद्धत ‘अनावश्यक आणि उपस्थितांवर ओझे टाकणारी’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शशी थरूर नेमकं काय म्हणाले होते?
“वंदे मातरम् हे आपले राष्ट्रीय गीत आहे आणि ते गायले जात असताना आम्ही सर्वजण आदराने उभे राहतो. पण प्रत्येक कार्यक्रमात संपूर्ण गाणे सक्तीचे करणे योग्य नाही. सहसा लोकांना या गीताचे पहिले किंवा दुसरी ओळ तोंडपाठ असते. पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गीत गायले जायचे आणि शेवटी राष्ट्रगीत जन गण मन व्हायचे. पण आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटीही पाचही कडवी गाण्याची सक्ती केली जात आहे, जे चुकीचे आहे.”
काँग्रेसवर भाजपचा पलटवार
शशी थरूर यांच्या या भूमिकेवर केरळ भाजपचे अध्यक्ष आणि आमदार राजीव चंद्रशेखर यांनी घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस पक्ष हा ‘मुस्लिम लीग’च्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रशेखर म्हणाले, “काँग्रेस पक्षाकडून दुसरी काय अपेक्षा करणार? त्यांचे राजकारण, त्यांचे राष्ट्रीयत्व आणि भारताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा इंडियन युनियन मुस्लिम लीग, जमात-ए-इस्लामी आणि एसडीपीआय (SDPI) सारख्या संघटना ठरवतात. आज त्यांना राष्ट्रीय गीताचा त्रास होतोय, उद्या ते राष्ट्रगीतावरही प्रश्न उपस्थित करतील.”
‘वंदे मातरम्’चा इतिहास काय सांगतो?
- लेखन: बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७० च्या दशकात हे गीत लिहिले होते.
- राष्ट्रीय गीताचा दर्जा: २४ जानेवारी १९५० रोजी भारताच्या संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा (National Song) अधिकृत दर्जा दिला.
- नवा नियम: गृह मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या आधी ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, १९३७ मध्ये वगळण्यात आलेल्या कडव्यांसह आता या गीताची सर्व ६ कडवी गायली जाणार असून, या दरम्यान सर्वांना सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक आहे.
