कोलकाता : निकालाच्या दिवसापासूनच पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराने भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाच्या हत्येनंतर उग्र रूप धारण केले आहे. ही हत्या पूर्वनियोजित असून त्यात सराईत गुन्हेगारांचा हात असावा, असा पोलिसांचा संशय आहे. भाजपने मात्र, याप्रकरणी तृणमूल काँग्रेसवर आरोप केल्याने या दोन्ही पक्षांत शाब्दिक धुमश्चक्री सुरू झाली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून आतापर्यंत चार जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थक-कार्यकर्त्यांकडून जाळपोळ, कार्यालयांची मोडतोड, हाणामारीच्या घटना गुरुवारीही सुरू होत्या. त्यातच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात रथ यांचा चालकही गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
रथ यांचा मृतदेह पूर्व मेदिनापूर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी चंडीपूर येथे नेण्यात आला. अधिकारी यांनी या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करत तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ‘‘भारतीय हवाई दलातील माजी जवान रथ यांची हत्या निर्दयी आहे. रथ यांचा माझ्याशी असलेल्या संबंधामुळे आणि भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यामुळे ही हत्या करण्यात आली,’’ असा आरोप अधिकारी यांनी केला. रथ यांच्या शोकाकुल आईनेही हाच आरोप केला. ही हत्या भवानीपूरमधील बॅनर्जी यांच्या पराभवाशी संबंधित आहे. तो अधिकारी यांच्यासाठी काम करत होता म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, असे त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितले.
भाजप– तृणमूलमध्ये संघर्ष
रथ यांच्या या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्णपणे र्हास झाल्याचे दिसून येते, असा आरोप करत भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूलवर टीका करत निवडणुकीतील विजयानंतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे सांगितले. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले. या हत्येमध्ये पक्षाचा कोणताही हात नसून तपास पूर्ण होण्यापूर्वीच भाजपने या घटनेचे राजकारण केल्याचा आरोप केला. काँग्रेस व माकपच्या नेत्यांनीही या हत्येचा निषेध केला आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
हत्या कशी झाली?
चंद्रनाथ रथ बुधवारी रात्री १०.३० वाजता कोलकाताहून मध्यमग्राम येथील निवासस्थानी परतत होते. डोलतला आणि मध्यमग्राम चौमाथा दरम्यान दोहरियाजवळ त्यांचे वाहन अडवण्यात आले.
प्राथमिक निष्कर्षांनुसार एका छोट्या चारचाकी वाहनाने प्रथम रथ यांच्या एसयूव्हीचा वेग कमी केला, त्यानंतर मोटारसायकलवरील एका हल्लेखोराने वाहनाजवळ येऊन अगदी जवळून अनेक गोळ्या झाडल्या.
रथचा चालक बुद्धदेव बेरा यालाही गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, कोलकाता येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हत्येत सराईत गुन्हेगारांचा सहभाग?
* रथ यांच्यावर गोळीबार करून मोटारसायकलवरून पळून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कोलकाता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
’हत्येनंतर पोलिसांनी जप्त केलेल्या बेवारस कारची क्रमांक पाटी बनावट असल्याचे आढळले. चेसिस नंबर व इंजिन नंबर पुसून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या हत्येचे नियोजन आधीच करण्यात आले होते, असा कयास आहे.
* हल्ल्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकलींपैकी एक दुचाकी घटनास्थळापासून चार किमी अंतरावर एका चहाच्या टपरीजवळ आढळून आली.
* न्यायवैद्यक तज्ज्ञांनी हल्ल्यात अत्याधुनिक ग्लॉक पिस्तूल वापरले गेले असावे, असे संकेत दिले आहेत. अशा प्रकारचे शस्त्र सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत.
* यात सराईत गुन्हेगारांच्या सहभागाचा संशय असून आम्ही तपासणी करत आहोत, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
विधानसभा विसर्जित
पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल आर. एन. रवी यांनी एका अधिसूचनेनुसार ती विसर्जित केली. राज्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सलग तिसर्यांदा सत्तेवर आल्यानंतर मे २०२१ मध्ये सध्याच्या विधानसभेची स्थापना करण्यात आली होती.
