बामसेरगंज : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेत ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली त्यांनी न्यायाधिकरणाकडे अपील करावे. नावे वगळल्याचा बदला मतदानातून घ्या, आणि निकालातून त्याचे उत्तर द्या, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. मुरशिदाबाद जिल्ह्यात आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

बॅनर्जी म्हणाल्या, मतदार यादीतील नावे वगळण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात आहे. ईव्हीएम मशिन्समध्ये काही ठिकाणी बिघाड घडवून आणण्याचा आरोप करत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मशीन बदलू देऊ नका, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

‘एसआयआर’च्या नावाखाली काहींची नावे वगळली जात आहेत. काहींना धमकावले जात आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदार यादीचा वापर का केला जात नाही, असा सवाल बॅनर्जी यांनी केला. ‘एनआरसी’च्या नावाखाली स्थानबद्धता छावण्या उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, आम्ही असे कॅम्प कधीही उभारू देणार नाही. कोलकात्यातील आपल्या भवानीपूर मतदारसंघात ४० हजार नावे वगळली गेल्याचा दावा त्यांनी केला. ज्यांना मतदानाची संधी मिळेल, ते तृणमूल काँग्रेसलाच मत देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.