कोलकाता : निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालमधील विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) मतदारयादी प्रकाशित केली. या यादीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या प्रक्रियेपासून जवळपास ६६ लाख नावे वगळली जाण्याची शक्यता आहे तर ६० लाख नावांवर अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेल्या या याद्यांवरून दिसून आले आहे.

यापूर्वी १६ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या मसुदा यादीत मतदारांची संख्या आधीच्या ७.६६ कोटींवरून ७.०८ कोटींवर आली होती, मृत्यू, स्थलांतर, दुबार आणि शोध न लागणे या कारणास्तव ५८ लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली होती.

सुनावणी आणि छाननीनंतर सुमारे आठ लाख अतिरिक्त नावे वगळण्यात आल्याची नोंद झाल्यानंतर, ‘एसआयआर’शी संबंधित वगळण्यात आलेल्यांची एकूण संख्या आता ६६ लाख झाली आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एसआयआर’ प्रक्रियेनंतर वगळण्यात आलेली आणि जोडण्यात आलेल्या नावानंतर पश्चिम बंगालमध्ये मतदारांची संख्या ७.०४ कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी दिली.

सुमारे ६०.०६ लाख मतदारांच्या अर्जात तार्किक विसंगती असल्याने त्यांना विचाराधीन वर्गीकृत करण्यात आले असून त्यांचे भवितव्य न्यायिक अधिकारी ठरवणार आहे. वगळलेली आणि विचाराधीन नावे यांच्या आकडेवारीमुळे एसआयआरनंतर प्रकाशित होणाऱ्या यादीवर राजकीय वादंंग होण्याची चिन्हे आहेत.

‘एसआयआर’च्या नावाखाली छळ आणि बंगालच्या नागरिकांबाबत द्वेषाचे टोक गाठले आहे. वैध मतदाराचे नाव वगळण्यात आल्यास आंदोलन करण्यात येईल. भाजप विजयाचे स्वप्न पाहत असून त्यांची ही रणनीती अपयशी ठरेल. – तन्मय घोष, नेते, तृणमूल काँग्रेस</strong>.

यादी प्रसिद्धीतून कोणाला फायदा झाला किंवा कोणाला पराभव झाला हे ठरवणे हे राजकीय पक्षांचे काम नाही. प्रकाशित यादीच्या आधारे निवडणूक लढवाव्या लागतील. – जगन्नाथ चट्टोपाध्याय, नेते, भाजप.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून ४७ हजार नावे बाद

या वर्षी राज्यात होत असलेल्या निवडणुकीपूर्वी शनिवारी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातून ४७,००० हून अधिक नावे वगळण्यात आली तर १४,००० हून अधिक नावे ‘विचाराधीन’ ठेवण्यात आली. येथील २०२१ च्या पोटनिवडणुकीत बॅनर्जी यांनी मिळवलेल्या ५८,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकापेक्षा सुमारे ११,००० कमी आहे.

आयोगाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड

मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगाची वेबसाइट आणि त्याच्या मोबाइल ॲप्लिकेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम बंगालमधील मतदारांना त्यांची स्थिती तपासता आली नाही. तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील ऑनलाइन माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याबाबत वापरकर्त्यांनी तक्रारही केली. आयोगाचे मतदार सेवा पोर्टल आणि राज्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची वेबसाइट दोन्ही प्रतिसाद देत नसल्याने यादीतील नावे तपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.