Shahida Fakir Deported Bangladesh from Mumbai: नवी मुंबईत गेल्या २० वर्षांपासून राहणाऱ्या बंगालच्या शाहिदा फकीर यांना काही दिवसांपूर्वी घुसखोर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले. १८ जुलै रोजी शाहिदा फकीर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची रवानगी बांगलादेशमध्ये करण्यात आली. ४० वर्षीय शाहिदा त्यांचे पती जुम्मन फकीर (वय ४५) यांच्यासह नवी मुंबईतील एका गृहसंकुलात केअरटेकर म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर त्यांचा सातवीत शिकणारा लहान मुलगाही राहतो. हे दाम्पत्य मुळचे पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील असून त्यांचा मोठा मुलगा गावातच मोबाइल रिपेअरिंगचे दुकान चालवतो.

शाहिदाचे पती जुम्मन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, १८ जुलै रोजी शाहिदा बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिचा मोबाइलही जप्त केला. आम्हाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा आम्ही सर्व दस्तऐवज घेऊन चेंबूरच्या निगराणी केंद्रात पोलिसांची समजूत काढण्यासाठी पोहोचलो. माझ्या पत्नीचा जन्म दाखला, तिच्या आई-वडिलांचे जमिनीचे कागदपत्र आणि इतर ओळखपत्रही आम्ही दाखवले. तरीही तीन दिवसानंतर आम्हाला सांगण्यात आले की, तिला बांगलादेशला पाठविण्यात आले आहे. आम्ही भारतीय नागरिक असून दोन दशकांपासून नवी मुंबईत राहत आहोत. यापूर्वी आम्हाला कधीही काही अडचण आली नव्हती.

द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, शाहिदा यांना आधी आसामला नेण्यात आले. त्यानंतर एका गटासह त्यांना बांगलादेशमध्ये हद्दपार करण्यात आले. शाहिदा यांनी बांगलादेशच्या सातखिरा येथील एका कुटुंबाकडे आश्रय घेतला. तिथून त्यांनी आपल्या कुटुंबाला संपर्क साधून ही माहिती दिली.

बांगलादेशी नागरिकांनी केली मदत

सातखिराहून बोलताना शाहिदा यांनी आपल्यावर काय प्रसंग घडला? याची माहिती दिली. त्यांनी म्हटले, “आम्हाला आसाममधील सीमेवरून रात्री १ वाजता बांगलादेशमध्ये ढकलले. चिखल तुडवत शेतातून तब्बल आठ तास चालल्यानंतर मी मुख्य रस्त्यावर पोहोचले. माझी अवस्था पाहून स्थानिकांनी मदत देऊ केली. सातखिरा येथील एका कुटुंबाने मला आश्रय देत कपडे आणि अन्न पुरवले. मी कधीपर्यंत अशी राहू शकते? मी भारतीय नागरिक असून मला घरी परतायचे आहे. सातवीत शिकत असलेल्या माझ्या मुलाला कोण सांभाळेल?”

कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

शाहिदाचे कुटुंबीय आता कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. जुम्मन यांनी सांगितले की, माझे काका आणि कुटुंबातील सदस्य उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. शाहिदाला पुन्हा भारतात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

शाहिदाच्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबीयांनी पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यांनी म्हटले की, त्या तीन बहिणी आणि चार भाऊ आहेत. आम्हाला सुनावणीसाठी बोलावले असताना आम्ही आमचे सर्व कागदपत्र सादर केले होते. माझे भाऊ आणि एका बहिणीचे नाव मतदार यादीत आहे. मात्र माझे आणि मोठ्या बहिणीचे नाव सध्या न्यायाधिकरणासमोर विचाराधीन आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमधील श्रमिक एकता मंचाने ८ ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र लिहून शाहिदाच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना तात्काळ भारतात परत आणण्यासाठी राजकीय हस्तक्षेप व्हावा, अशी मागणी केली. श्रमिक एकता मंचाचे सचिव आसिफ फारूक यांनी म्हटले की, परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करावा. त्या भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना मायदेशी आणणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे सर्व दस्तऐवज आहेत.