जम्मू : लष्कर भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार असून अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भविष्यातील कोणत्याही संघर्षाचा निकाल जमिनीवर निर्णायक असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने एका बाजूला अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आणि दुसरीकडे युद्धविरामासाठी केविलवाणी धडपड केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

ममून मिलिटरी स्टेशनमधील ध्यानचंद स्टेडियमवर गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.  ‘त्यांनी (पाकिस्तानने) म्हटले होते की जर आमचा विनाश झाला, तर आम्ही अध्र्या जगाला बरोबर घेऊन जाऊ. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आम्ही त्यांच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. या वेळी आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत आणि आमच्याकडे भविष्यासाठी स्पष्ट योजना आहे,’ असे या वेळी लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले.

आमचे नेतृत्व देशाच्या आणि जनतेच्या भल्यासाठी वचनबद्ध आहे, तर त्यांचे नेतृत्व आणि लष्करी जनरल केवळ सत्तेत राहण्यासाठी आणि स्वत:चे महत्त्व टिकवण्यासाठी स्वार्थाने प्रेरित आहेत. याच कारणासाठी ते भारताबरोबर युद्धासारखी परिस्थिती लांबवू इच्छितात, असे लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले. पाकिस्तानकडे भारताशी समोरासमोर लढण्याचे ना धैर्य आहे ना ताकद, म्हणूनच ते छुप्या युद्धाचा अवलंब करतात, असेही ते म्हणाले.