scorecardresearch

पाश्चिमात्य राष्ट्रे, अमेरिका दुटप्पी!; पुतिन यांची टीका, वसाहतवादातून भारत-आफ्रिकेला लुटल्याचा आरोप

डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया या युक्रेनमधील चार प्रांतांत सार्वमत घेतल्यानंतर त्यांचे रशियात विलीनीकरण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी ही टीका केली.

पाश्चिमात्य राष्ट्रे, अमेरिका दुटप्पी!; पुतिन यांची टीका, वसाहतवादातून भारत-आफ्रिकेला लुटल्याचा आरोप
पाश्चिमात्य राष्ट्रे, अमेरिका दुटप्पी!; पुतिन यांची टीका, वसाहतवादातून भारत-आफ्रिकेला लुटल्याचा आरोप

पीटीआय, मॉस्को : ‘‘पाश्चिमात्य देशांनी एके काळी भारत आणि आफ्रिकेत अत्याचार करून लुटमार केली. गुलामांचा व्यापार केला. अमेरिकेने अणुबाँब आणि रासायनिक शस्त्रांचा वापर करून नरसंहार केला. आता हे देश नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था असावी यावर भर देत आहेत. ही अव्वल दर्जाची फसवणूक आहे,’’ अशी टीका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी केली. त्यांनी यावेळी अमेरिकेसह पाश्चिमात्य राष्ट्रांच्या दुहेरी मापदंडाचा (दुटप्पीपणा) निषेध केला.

डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया या युक्रेनमधील चार प्रांतांत सार्वमत घेतल्यानंतर त्यांचे रशियात विलीनीकरण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी ही टीका केली. हे सार्वमत अमेरिकेसह पाश्चात्त्य राष्ट्रांनी अमान्य केले आहे. युरोपीय राष्ट्रांच्या परिषदेने हे विलीनीकरण फेटाळले आहे. पुतिन यांनी शुक्रवारी क्रेमलिनजवळील ‘सेंट जॉर्ज हॉल’मध्ये केलेल्या भाषणात ही टीका केली.

‘क्रेमलिन’च्या अधिकृत संकेतस्थळावर पुतिन यांच्या भाषणाच्या इंग्रजी आशयानुसार पुतिन म्हणाले, ‘‘पाश्चिमात्य नियमांवर आधारित व्यवस्थेचा आग्रह धरत आहेत. मात्र, हे नियम कोणी बनवले? ते कोणी मान्य किंवा मंजूर केले? हा निव्वळ मूर्खपणा, फसवणूक, पक्षपातीपणा व दुटप्पी नव्हे तिहेरी मापदंड आहेत. विरोधी राष्ट्रांना वाटते की आम्ही मूर्ख आहोत. रशिया व रशियन संस्कृती हजारो वर्षांपासून महान शक्ती आहे. खोटय़ा-तकलादू नियमांनी तिला धक्का लावता येणार नाही. पाश्चात्त्य त्यांच्या ऐतिहासिक गुन्ह्याबद्दल इतरांना दोषी ठरवत आहेत. संबंध नसलेल्या देशांना वसाहतवादातील अत्याचारांच्या चुका मान्य करण्यास सांगत आहेत. पाश्चिमात्यांनी मध्ययुगीन काळात वसाहतवादी धोरण सुरू केले. त्यानंतर गुलामांचा व्यापार, मूळ अमेरिकावासी (रेड इंडियन्स) यांचा नरसंहार, भारत आणि आफ्रिकेतील देश लुटले. हे मानवता, सत्य, स्वातंत्र्य आणि न्यायविरोधी होते.’’ खरे तर पाश्चिमात्यांनीच परदेशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. आता ते स्वार्थासाठी कोणाला स्वनिर्णय घेण्याचा अथवा न घेण्याचा अधिकार असल्याचे ठरवत आहेत. हा अधिकार त्यांना कोणी दिला? ते इतरांना फक्त गृहीत धरतात, अशी टीकाही पुतिन यांनी केली.

युक्रेन अणुऊर्जा प्रकल्पप्रमुखाच्या अपहरणाचा रशियावर आरोप

युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झोपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प प्रमुखाचे रशियाने अपहरण केल्याचा आरोप युक्रेनच्या अणुऊर्जा विभागाने केला. या प्रकल्पाचे महासंचालक इहोर मुराशोव्ह यांचे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास रशियन सैन्याने अपहरण केले व हा प्रकल्प ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. युक्रेनची अणुऊर्जा कंपनी ‘एनर्गोटम’ने शनिवारी ही माहिती दिली. रशियाने मात्र मुराशोव्ह यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिलेला नाही.

‘एनर्गोटम’चे अध्यक्ष पेट्रो कोटिन यांनी सांगितले, की रशियन सैनिकांनी मुराशोव्ह यांची मोटार थांबवली, त्याच्या डोळय़ावर पट्टी बांधली आणि नंतर त्यांना अज्ञात स्थळी नेले. या घटनेमुळे युक्रेन आणि युरोपमधील या सर्वात मोठय़ा अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (आयएईए) कर्मचारी आहेत. त्यांनी मात्र त्यांनी मुराशोव्ह यांच्या अपहरणाचा ‘एनर्गोटम’चा दावा अमान्य केला. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षांची झळ झोपोरीझिया प्रकल्पाला वारंवार बसली आहे.

‘नाटो’त समावेशासाठी युक्रेन आग्रही

रशियाने चार प्रांतांचे एकतर्फी विलिनीकरण केल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’मध्ये सहभागाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर झेलेन्स्कींनी ‘नाटो’ सहभागाबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र आता ‘जलद समावेशासाठी अर्ज’ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खारकीव्हजवळ रशियाची माधार; युक्रेनच्या सैनिकांचा महत्त्वाच्या शहरावर ताबा

कीव्ह (युक्रेन) : युक्रेनच्या फौजांनी चारही बाजुंनी वेढा घातल्यानंतर रशियाच्या सैन्याने खारकीव्हजवळचे लिमन शहरातून माघार घेतली. युद्धनितीच्या दृष्टीने हे शहर अत्यंत महत्त्वाचे असून त्यामुळे आता युक्रेन सैन्याला डोनेस्क आणि लुहान्स्क प्रांतांमध्ये मुसंडी मारणे शक्य होईल. ‘लिमन ताब्यात घेताना युक्रेनच्या सैन्याची मोठी हानी झाली. मात्र आपल्या सैनिकांची संख्या कमी असल्यामुळे शहरातून माघार घ्यावी लागली’ असे स्पष्टीकरण रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिले. युक्रेनचे चार प्रांत विलीन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियावर महत्त्वाचे ठाणे गमावण्याची नामुष्की आली आहे. दोन आठवडय़ांत युक्रेनच्या फौजांनी  खारकीव्हजवळचा बराच प्रदेश काबीज केला आहे. लिमनच्या पराभवामुळे चार प्रांत आपलेच आहेत, हा रशियाचा दावा कमकुवत झाल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या