केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन पुकारले होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर मुंबईत होणारा २६ जुलै रोजीचा तिरंगा मार्च होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबद्दल आज ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. शिवाजी पार्कवर होणारा उद्याचा (२६ जुलै) मोर्चा होणार असून या मोर्चातून जेन झीचे अभिनंदन केले जाणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके आणि देशातील सर्व तरुणांचे अभिनंदन केले. ज्या तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला, त्यांच्या पालकांचेही आभार ठाकरेंनी मानले.
हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. तर या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे. गेली १२ वर्ष रोज काही ना काहीतरी दबाव सरकारकडून देशाच्या जनतेवर टाकला जात होता. मग नोटबंदी असेल किंवा इतर काही असेल. या देशात जणू काही लोक शिल्लकच राहिलेले नाहीत, फक्त झुरळं राहिलेली आहेत, अशा अर्विभावात सत्ताधारी वागत होते, त्यांना या आंदोलनामुळे चपराक बसली असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले आहे. ज्यांनी या तरुणांना झुरळ म्हटले, त्यांनी सुद्धा हे समजून घेतले पाहिजे की, आपण खुर्चीवर बसलो आहोत, तर डोक्यात माज जाऊ देऊ नये. देशातील युवा शक्ती ही जर एकत्र आली तर काय करू शकते, त्याची ही झलक आहे.”
या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपाचा एक बीभत्स, भीषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवर लाठ्या चालवल्या गेल्या, युवतींवर हात उचलला गेला, ते निषेधार्ह होते. या पोलिसांवर कोण गुन्हे दाखल करणार? तसेच साध्या वेषातील गुंड कुणी घुसवले होते? त्यांना शोधून कारवाई केली जाणार की नाही? हाही मोठा प्रश्न आहे. तसेच विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार की नाही, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी द्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मोर्चाबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबईत रविवारी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणेच शिवाजी पार्कहून सिद्धिविनायक मंदिराकडे तिरंगा मार्च जाईल. ज्या तरूणांमुळे या आंदोलनाला यश मिळाले. त्या तरुणांचे अभिनंदन या मोर्चातून केले जाईल. मोर्चात कोणताही बदल झालेला नाही.
