World’s Highest Railway Bridge : जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं आज (६ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. हा रेल्वे पूल जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे. चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं मोठ्या प्रमाणात अवघड मानलं जात होतं. मात्र, तरीही हे आव्हान पूर्ण करत अभियंत्यांनी चिनाब पुलाचं काम यशस्वी पूर्ण केलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी देखील पार पडली होती. त्यानंतर आज या पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैंकी एक म्हणजे चिनाब पूल प्रकल्प मानला जात होता. या चिनाब पुलाला रेल्वे क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. अभियांत्रिकी चमत्कार मानला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. माहितीनुसार, चिनाब पुलाच्या दोन्ही बाजूंना झिंकने कोट केलेलं आहे. या बहुचर्चित पूलावरून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन (USBRL) सुरु होईल.

चिनाब पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

प्राप्त माहितीनुसार, चिनाब पुलासाठी २००८ मध्ये करार करण्यात आला होता. हा चिनाब पूल जम्मूतील बक्कल आणि कौरीतून सुरू होतो आणि कटरा ते बनिहालला जोडतो. हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) चा एक भाग आहे. यामागचा उद्देश असा आहे की हवामान बदल आणि इतर नैसर्गिक बदलादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणं आहे. हा पूल तयार होण्यासाठी तब्बल १४ हजार कोटी रूपयांचा खर्च आल्याचं सांगितलं जातं.

चिनाब हा पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. तसेच आयफेल टॉवरपेक्षा पूल ३५ मीटर उंच असून या पुलाचं आयुष्य १२० वर्षे इतकं असल्याचं सांगितलं जातं. जगातील सर्वात उंच चिनाब पुलाच्या उद्घाटनापूर्वी स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक चाचण्या देखील करण्यात आलेल्या आहेत. २६० किमी प्रतितास वेगाच्या वार्‍यांना आणि अति जास्त तापमान व भूकंपासह आदी समस्यांना तोंड देण्यास हा पूल सक्षम असेल.’द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, चिनाब, कौरी आणि बक्कलच्या दोन्ही बाजूंनी बसवलेली पुलाची कमान महाकाय केबल क्रेनच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. जी तयार करण्यास अभियंत्यांना तीन वर्षांचा कालावधी लागला.

जम्मू आणि काश्मीरसाठी चिनाब पूल वरदान ठरणार?

जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी चिनाब पूल वरदान ठरणार असल्याचं बोललं जातं. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर २० वर्षांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर हा पूल अखेर सुरू झाला आहे. या प्रदेशात वाहतूक सुविधेचा प्रश्न आहे. हा प्रश्न या पुलामुळे या प्रदेशात पुढे तयार होणार्‍या प्रकल्पांसाठी प्रवास आणि मालाची वाहतूक सुलभ होईल असं मानलं जातं. तसेच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश असल्यामुळे हा या प्रदेशात तैनात असलेल्या सशस्त्र दलांसाठी रेल्वे मार्ग अधिक उपयुक्त ठरेल आणि पर्यटनाला चालना देण्यासही याची मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चिनाब पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राजकीयदृष्टय़ा फायद्याचा असल्याचंही बोललं जातं. कारण चिनाब पुलाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक विकास घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिलं जातं. कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकास कामांचं आश्वासन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.