Donald Trump Netanyahu Election Iran War Impact: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का देत डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासमोरील सत्ता टिकवण्याचे आव्हान अधिक बिकट झाले आहे. या दोन्ही राजकीय घडामोडींनंतर अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे भवितव्य काय असणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) दोन्ही सभागृहांवर आता डेमोक्रॅट्सचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आणि त्यामुळे भडकलेली इंधन दरवाढ यावरून मतदारांमध्ये तीव्र नाराजी होती; हीच नाराजी रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरल्याचे मानले जात आहे. तर इस्रायलमध्ये नेतान्याहू यांच्या उजव्या विचारसरणीच्या आघाडीने संसदेतील बहुमत गमावल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य अधांतरी लटकले आहे.
वॉशिंग्टन आणि जेरुसलेममधील बदललेल्या या राजकीय समीकरणांमुळे आता इराण संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेत्यांवर अंतर्गत दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युद्ध लांबवणे ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या कठीण
अमेरिकन संसदेवरील डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. इराणविरोधात सुरू असलेला संघर्ष आता ट्रम्प यांच्यासाठी देशांतर्गत पातळीवर राजकीय डोकेदुखी ठरला आहे. युद्ध, वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. आखातातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर या संघर्षामुळे परिणाम झाल्याने कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत.
प्रतिनिधी गृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांत आता डेमोक्रॅट्सचे वर्चस्व असल्याने ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी निर्णयांवर, युद्धावरील खर्चावर आणि परराष्ट्र धोरणावर विरोधकांचा कडक पहारा असेल. असे असले तरी कमांडर-इन-चीफ म्हणून ट्रम्प यांचे अधिकार या निकालांमुळे थेट संपुष्टात येत नाहीत. लष्करी कारवाया आणि परराष्ट्र धोरणाबाबत राष्ट्राध्यक्षांना विशेष अधिकार असतात. संसदेतील सुनावण्या, तपास, निधीचा पुरवठा रोखणे आणि नवीन कायदे याद्वारे डेमोक्रॅट्स ट्रम्प प्रशासनावर दबाव आणू शकतात, मात्र थेट युद्ध थांबवण्याचा आदेश ते देऊ शकत नाहीत.
नेतान्याहू यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
अमेरिकेतील निकालांच्या काही दिवस आधीच, म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत नेतान्याहू यांच्या आघाडीने इस्रायली संसदेतील बहुमत गमावले आहे. मात्र नेतान्याहू यांची सत्ता अद्याप अधिकृतरीत्या गेलेली नाही. १२० सदस्यांच्या इस्रायली संसदेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा आकडा नेतान्याहू यांच्या उजव्या विचारसरणीच्या गटाला गाठता आलेला नाही, तसेच गडी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीलाही बहुमत सिद्ध करता आलेले नाही.
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हेर्झॉग यांनी निवडणूक निकालांना मंजुरी दिली असून पुढील सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. आघाडीच्या वाटाघाटी पूर्ण होईपर्यंत नेतान्याहू काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहत आहेत. इस्रायलमध्ये येणारे नवे सरकार इराणबाबत कोणती भूमिका घेते? यावर पुढील दिशा ठरणार आहे.
इराणची चर्चेची तयारी, मात्र संघर्षाचा इशाराही कायम
दुसऱ्या बाजूला, या संघर्षातून राजनैतिक मार्ग काढण्यासाठी इराणचे अधिकारी मध्यस्थांच्या संपर्कात आहेत. ‘अल जझीरा’च्या वृत्तानुसार, दोहा येथे सुरू असलेल्या चर्चेत इराणने एक प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेने इराणच्या अटी मान्य केल्यास, दोन दिवसांत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करून वॉशिंग्टनसोबत शांतता चर्चा सुरू करण्याची तयारी इराणने दर्शवली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी कतारच्या मध्यस्थीने ही चर्चा सुरू असल्याची पुष्टी केली आहे. “विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात या वाटाघाटी कधी थांबल्याच नव्हत्या,” असे सांगत वॉशिंग्टन राजनैतिक तोडग्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही चर्चेची तयारी दर्शवली असली, तरी अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा हल्ले केल्यास नव्या लष्करी संघर्षाला तोंड देण्यासाठी देश सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी बजावले आहे की, “कोणत्याही नव्या लष्करी धोक्याला इराणकडून तात्काळ आणि कोणत्याही भौगोलिक मर्यादेविना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.”
