Watermelon Food Poisoning Mumbai Pydhonie Death Case: उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहत असताना त्यातून थोडासा दिलासा मिळावा, यासाठी कलिंगड खाल्ले जाते. ग्रामीण भागापासून ते मेट्रो शहरांमध्येही अतिशय परवडणाऱ्या दरात मिळणारे कलिंगड लहानथोरांचे आवडते फळ. मात्र मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या घटनेमुळे कलिंगडाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. एका कुटुंबातील चार सदस्यांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर रात्री कलिंगडाचे सेवन केले आणि सकाळी अन्नातील विषबाधेमुळे एकामागून एक असा चारही जणांचा मृत्यू झाला. कुटुंबप्रमुखाने मृत्यूपूर्वी कलिंगड खाल्ले असल्याचे सांगितले आणि तिथून सुरू झाला गोंधळ. मात्र हे मृत्यू कलिंगडामुळे झाले आहेत का? हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
नेमके प्रकरण काय आहे?
पायधुनी येथील अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशा चार जणांचा २६ एप्रिल रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी आदल्या दिवशी २५ एप्रिलच्या रात्री या चार जणांनी इतर नातेवाईकांसह बिर्याणीचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर स्वतःच्या घरी गेल्यानंतर रात्री १ ते १.३० च्या दरम्यान चौघांनी कलिंगड खाल्ले.
रविवारी (२६ एप्रिल) पहाटे चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. आधी स्थानिक डॉक्टरने तपासल्यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे चौघांचाही मृत्यू झाला.
अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
डोकाडिया कुटुंबियांनी जे कलिंगड खाल्ले त्यावर किटकनाशके फवारलेली असावीत, असा दावा करण्यात येत होता. अन्न सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना ते म्हणाले, किटकनाशकांच्या वापरामुळे अशी दुर्घटना घडू शकत नाही.

“कलिंगड हे एक कृषी उत्पादन आहे. जोपर्यंत त्याची काढणी होत नाही, तोपर्यंत ते आमच्या अखत्यारीत येत नाही. पण त्याआधी, त्यावर १४ ते १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे फळावर कीटकनाशकांचे अवशेष असणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही”, अशी माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे-पाटील यांनी दिली.
दुबे-पाटील पुढे म्हणाले की, द्राक्षांसारख्या इतर अनेक फळांवरही कीटकनाशकांचे अवशेष असतात. तसेच अन्न सुरक्षा नियमाक संस्थेने त्या डोकाडिया कुटुंबाच्या घराची तपासणी केली. त्यांच्या घरातील कलिंगडाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी परिसरातील फळ विक्रेत्यांकडेही चौकशी केली. पण कलिंगड कुणाकडून खरेदी केले होते, याची माहिती मिळू शकलेली नाही.
विक्रीसाठी ठेवलेल्या कलिंगडाची तपासणी होणार
या प्रकरणामुळे आता कलिंगड फळाबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील कलिंगडांची तपासणी करण्यात येणार का? प्रश्न दुबे-पाटील यांना इंडियन एक्सप्रेसकडून विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “आम्ही आंब्याच्या तपासणीसाठी एक मोहीम राबवत आहोत. आंबा नैसर्गिकरित्या पिकण्यापूर्वीच काढला जातो आणि नंतर कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकवला जातो. हे थांबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण टरबूज तयार झाल्यावरच काढले जाते. सध्यातरी कलिंगडाबाबत तपासणी सुरू केलेली नाही. मात्र याबाबत काही शंका असल्यास नक्कीच तपासणी करू.”
अन्न व औषध प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही डोकाडिया यांच्या घरातून खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले आहेत. अर्धवट खाल्लेल्या कलिंगडाचे तुकडे, ताटांत आणि भांड्यात उरलेली बिर्याणी आणि पुलाव, स्वयंपाकघरातील कच्चा तांदूळ, किचनच्या ओट्यावर ठेवलेला बिर्याणी मसाला, हळद, मिरची पूड आणि मीठ यासारखे मसाले यांचा समावेश आहे. याशिवाय अर्धवट खाल्लेले खजूर, ग्लासात उरलेले पिण्याचे पाणी अशा इतर वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत.

हे सगळे नमुने वांद्रे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लवकरच त्याचा अहवाल मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या प्रकरणात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) आणि शवविच्छेदन अहवाल अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्व अहवालाच्या निष्कर्षांचे एकत्रित मूल्यांकन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यास मदत होईल.
पायधुनी परिसरातून कलिंगड गायब
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पायधुनी परिसरात संशयित कलिंगडाचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या परिसरात त्यांना एकही कलिंगड विक्रेता आढळला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी चारही जणांचा मृत्यू झाल्यानंतर कलिंगडाचे नमुने गोळा करण्यासाठी पथकाने परिसराला भेट दिली. मात्र बाजारपेठेत त्यांना एकही कलिंगड आढळले नाही.
कलिंगड कुठून आणले होते, यासाठी नातेवाईकांशीही चर्चा करण्यात आली. पण त्यांनाही याबद्दल कोणतीही माहिती नाही. सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही या परिसरातील बाजारपेठेत तपासणी केली असता एकही कलिंगड विक्रेता आढळून आला नाही. जर स्थानिक बाजारपेठेतून संबंधित कलिंगड विकत घेतले असेल तर इतर ग्राहकांनीही ते घेतल्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत इतर कोणतीही विषबाधेची घटना नोंदवली गेलेली नाही.
जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितले?
सर जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डोकाडिया कुटुंबियांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची लक्षणे नेहमीच्या अन्नविषबाधेसारखी नव्हती. इतक्या वेगाने आणि तीव्रतेने प्रकृती खालावणे हे सामान्य नाही. हे काहीतरी वेगळ्या म्हणजे कदाचित विषारी किंवा रासायनिक घटकाच्या संपर्काचे संकेत देत आहे. कलिंगड हे हानिकारक फळ नाही तसेच दिवस असो वा रात्री खाल्ल्याने गंभीर आजार किंवा मृत्यू होतो याचा कोणताही पुरावा नाही.
