दोन दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब खेचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर काँग्रेसने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राजदने नितीश कुमार आता पक्के ‘संघी’ झाले आहेत अशी बोचरी टीका केली होती. दरम्यान बिहारचे मंत्री संजय निशाद यांनी नितीश कुमार यांची बाजू घेतली आहे.

संजय निशाद काय म्हणाले?

“नितीश कुमारही माणूस आहेत. त्यांच्यावर टीका करुन, हिजाब खेचला म्हणत मागे लागून काय होणार आहे? हिजाब खेचला तर एवढा वादंग माजला. त्या महिलेला दुसरीकडे कुठे स्पर्श केला असत तर काय झालं असतं?” असं वक्तव्य करत निशाद यांनी नितीश कुमार यांच्या कृतीची पाठराखण केली आहे.

अस्लम शेख यांची टीका

दरम्यान काँग्रेसचे माजी मदर अस्लम शेख यांनी संजय निषाद यांच्यावर टीका केली आहे. हिजाब हा मुस्लिम महिलेसाठी सन्मान आहे, तिच्यासाठी हिजाब पवित्र आहे. नितीश कुमार यांनी हिजाब खेचून महिलेचा अपमान केला आहे. तर संजय निशाद यांनी नितीश कुमारांची पाठराखण करुन तिचा अपमान केला आहे. महिलांबाबत हे लोक कसा विचार करतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. असंही भाजपाच्या राज्यात अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटतंच. एकीकडे यांचे नेते बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देतात. दुसरीकडे अशा प्रकारे अपमान केला जातो. अशी टीका अस्लम शेख यांनी केली.

हिजाब खेचण्याचं प्रकरण नेमकं काय?

लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.

काँग्रेसनेही केली टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निर्लज्जपणा बघा, जेव्हा एक महिला डॉक्टर आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरुन हिजाब खेचला. बिहारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केलं आहे. विचार करा, राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे माफीलायक नाही, असेही काँग्रेसने म्हटलं आहे.