पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान सत्ता संभाळल्यानंतर चीन बरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याला विशेष प्राधान्य देणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. सीपीईसी प्रकल्प यशस्वी करण्याबरोबरच चीन बरोबरच संबंध अधिक बळकट, दृढ करण्याचा आपण प्रयत्न करु असे इम्रान यांनी सांगितले. चीनने आपला विकास कसा साधला ते आपल्यासमोर उत्तम उदहारण आहे असे इम्रान म्हणाले.

आपल्यासमोर गरीबी विरोधात लढण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आपल्याला चीनचे उदहारण घेता येईल. मागच्या ३० वर्षात चीनने ७० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. आपल्याला सुद्धा तसेच करायचे आहे. चीनच्या गरीबी निर्मूलनाचा अभ्यास करण्यासाठी मी एक पथक चीनला पाठवणार आहे असे त्यांनी सांगितले.

चीन प्रमाणेच अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याचाही माझा प्रयत्न असेल पण त्याचा दोन्ही देशांना फायदा झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात पाकिस्तान-अमेरिका संबंध मोठया प्रमाणावर बिघडले आहेत. शेजारच्या अफगाणिस्तानातही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे पाकिस्तानातही शांतता नांदेल असे ते म्हणाले. सौदी अरेबिया पाकिस्तानचा जवळचा मित्र, कठिण काळात नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे.