Private vs Public Health Insurance Plans: भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, औषध, सेवा आणि इतर प्रत्येक उद्योगात भारताला यश मिळताना दिसत आहे. तसेच नागरिकांना योग्य सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठीदेखील सरकार प्रयत्न करताना दिसते.
नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांना वेळेत आणि कमी खर्चात आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. सरकारकडून आरोग्य विमा मिळण्यासाठी काही निकष असतात. पात्र नागरिकांना हा आरोग्य विमा दिला जातो.
हृदयविकार, कर्करोग तसेच चिकनगुनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च खूप असतो. ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा अनेक नागरिकांना हा खर्च परवडत नाही. उपचारांअभावी त्यांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारावे, त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत, त्यांना वैद्यकीय उपचारांमुळे आर्थिक तणाव सहन करावा लागू नये अशा अनेक कारणांमुळे आरोग्य विम्याची सेवा पुरवली जाते.
आता या आरोग्य विम्याची सेवा फक्त शासनच पुरवते का? तर नाही. काही खासगी कंपन्यांकडूनदेखील नागरिकांना आरोग्य विमा दिला जातो. बजाज अलियान्झ, स्टार हेल्थ आणि केअर हेल्थ इन्शुरन्स यांसारख्या कंपन्या नागरिकांना आरोग्य विमा पुरवतात. आता प्रचलित खासगी व सरकारी आरोग्य विमा योजनांमधील नेमका फरक काय हे आपण जाणून घेऊ…
खासगी आरोग्य विमा
खासगी विमा कंपन्यांकडून नागरिकांना आरोग्य विमा दिला जातो. वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, औषधे या विम्यामध्ये कव्हर केली जातात. व्यक्ती हा विमा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी खरेदी करू शकतो, यामुळे वैद्यकीय खर्चापासून व्यक्तीला दिलासा मिळतो. तज्ज्ञांचा सल्ला, निवडक शस्त्रक्रिया आणि खासगी रुग्णालयातील सुविधांसह इतर आरोग्यसेवा या विम्याद्वारे दिल्या जातात.
खाजगी आरोग्य विम्याचे पैसे भरण्याचा कालावधी
खाजगी आरोग्य विमा घेताना विम्याच्या प्रकारानुसार ठराविक रक्कम भरावी लागते. ही रक्कम एकरकमी भरता येते. काही ठिकाणी टप्या-टप्याने पैसे भरण्याची मुभादेखील आहे, मुख्यत: उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्ती खासगी आरोग्य विमा खरेदी करतात.
खासगी विम्याचे प्रकार काय आहेत?
- १. वैयक्तिक पॉलिसी
यामध्ये व्यक्ती स्वत:साठी आरोग्य विमा खरेदी करतो. वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, औषधांच्या खर्चाचा यामध्ये समावेश असतो.
- २. कुटुंबासाठी पॉलिसी
कुटुंब आरोग्य विम्याद्वारे संपूर्ण कुटुंब एकाच आरोग्य विम्याद्वारे वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. असा विमा फायदेशीर मानला जातो.
- ३. ग्रुप पॉलिसी
कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कमी दरात हा आरोग्य विमा दिला जातो.
- ४. गंभीर आजारांचे कव्हरेज
कर्करोग, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विमा घेता येतो.
- ५. टॉप-अप प्लॅन्स
अशा पॉलिसीमध्ये जो तुमचा आरोग्य विमा असतो, त्याहून तुम्हाला इतर सुविधांची गरज असेल, त्या सुविधा मिळू शकतात.
सरकारी आरोग्य विमा
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांच्यासाठी सरकार आरोग्य विमासारख्या सेवा पुरवते. यामुळे व्यक्तीला त्वरित, कमी खर्चात आणि योग्य उपचार घेता येतात. आयुष्मान भारतसारख्या योजना राबवण्याचा उद्देश हा परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आहे. अशा योजनांमुळे लाखो लोकांना सार्वजनिक आरोग्य विमा उपलब्ध करून दिला आहे.
खाजगी आरोग्य विमा आणि सरकारी आरोग्य विमा यांतील मुख्य फरक:
खासगी आरोग्य विमा | सरकारी आरोग्य विमा | |
खर्च | जास्त पैसे भरावे लागतात | मोफत किंवा कमी खर्च |
व्याप्ती | व्यापक, प्रगत उपचारांचा समावेश | मूलभूत, अत्यावश्यक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित |
रुग्णालयांचे पर्याय | विस्तृत नेटवर्क, प्रामुख्याने खाजगी रुग्णालये | सरकारी आणि काही खाजगी रुग्णालयांपुरते मर्यादित |
लाभार्थी | प्रीमिअर भरण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना या विम्याचा लाभ घेता येतो. | सरकारने ठरवून दिलेल्या निकषावर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या विम्याचा फायदा होतो |
लक्ष्य गट | मध्यम ते उच्च उत्पन्न गट | आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक |
खासगी आरोग्य विम्याचे फायदे
- कव्हरेजमध्ये लवचिकता
खासगी विमा घेतलेल्यांना मातृत्व विमा कव्हर, दातासंबंधित आजार किंवा मानसिक आरोग्य सेवा यांसारख्या अतिरिक्त फायद्यांसह विमा निवडता येतो.
- प्रगत आरोग्यसेवेची उपलब्धता
खासगी विम्यामुळे, व्यक्तींना सर्वोत्तम सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि निवडक शस्त्रक्रिया त्वरित करता येते. कमी प्रतीक्षा कालावधी मिळतो.
सरकारी आरोग्य विम्याचे फायदे
- सर्वांसाठी सहज उपलब्ध
सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचे उद्दिष्ट कमी उत्पन्न गटांनाही मूलभूत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आहे.
- सर्वांना परवडणारे
सरकारी आरोग्य विम्याचा खर्च कमी असतो, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसणाऱ्यांनादेखील हा आरोग्य विमा घेता येतो, त्यामुळे जर घरातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली तर आर्थिक ताण सहन करावा लागत नाही. तसेच, त्वरित आरोग्य सेवा मिळतात.
खासगी विम्याचा खर्च जास्त असतो आणि काही गुंतागुंतीच्या अटी असतात. तर सरकारी विम्याच्यादेखील काही मर्यादा आहेत. आयुष्मान भारत योजनेत ओपीडी (आउट पेशंट डिपार्टमेंट) खर्च, रुग्णालयाबाहेरून खरेदी केलेली औषधे आणि कॉस्मेटिक सर्जरी यांसारख्या काही गोष्टींचा समावेश नाही.