अमेरिका आणि इराण यांच्यात मागील चार महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री करण्यास मंजुरी दिल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असून अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकेबंदी हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या सगळ्याबाबत इराणने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याचं सांगण्यात आलं. या शांतता करारातल्या १४ अटी कुठल्या हे आपण जाणून घेऊ.

कुठल्या १४ अटींवर समझोता?

१) इराणला कच्च तेल आणि पेट्रोकेमिकल्स संबंधीच्या ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या मुक्त करण्यात येतील.

२) इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिका त्यांचे निर्बंध मागे घेईल.

३) ६० दिवसांमध्ये इराणचे जे २४ अब्ज डॉलर गोठवण्यात आले होते त्यावरचे निर्बंध हटवण्यात येतील

४) इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र, इराणला ३०० अब्ज डॉलर्सच्या योजना सादर करेल.

५) लेबनॉनसह सर्व युद्ध तातडीने बंद केले जाईल.

६) अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.

७) अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती ३० दिवसाच्या आत पूर्णपणे हटवली जाईल

८) अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.

९) होर्मुज खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत ३० दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.

१०) अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी ६० दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.

११) इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.

१२) अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.

१३)अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.

१४) इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.

शाहबाज शरीफ यांची पोस्ट काय?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करार झाला आहे. दोनही पक्षांनी सर्व मुद्यांवर, याशिवाय लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहबती दर्शवली. पश्चिम आशियातील संघर्षावर मार्ग काढण्याच्या अमेरिका आणि इराण यांच्यातील कटिबद्धतेसाठी सहकार्य करणाऱ्या इतर देशांचे आभार, असंही शहबाझ शरीफ म्हणाले.

मागील १०८ दिवसांमध्ये काय घडलं?

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला. सर्वोच नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू

२ मार्च ला हिजुबल्लाहची युद्धात उडी

५ मार्चला अमेरिकेच्या आखातातील हवाई तळांवर इराणचे प्रतिहल्ले

८ एप्रिलच्या दिवशी म्हणजेच युद्धाच्या चाळीसाव्या दिवशी १४ दिवसांची शस्त्रसंधी जाहीर

१२ एप्रिलला पाकिस्तानात इराण आणि अमेरिकेची पहिली शांतता चर्चा कुठल्याही तोडग्याविना निष्फळ ठरली

२० एप्रिलच्या शांततेच्या चर्चेला इराण गैरहजर राहिल्याने दुसऱ्या चर्चेचा प्रयत्नही निष्फळ ठरला.

१८ मे रोजी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातला तणाव वाढला

६ जून रोजी शस्त्रसंधी तुटली, अमेरिकेने इराणचे ६ ड्रोन केले निकामी

८ जूनला इराणने अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडलं, १०० दिवसांनी युद्ध पुन्हा भडकलं.

९ जूनला अमेरिकेने इराणवर केले बॉम्ब हल्ले

१३ जूनला दोन्ही देशांमधला करार अंतिम टप्प्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

१५ जून शांतता करार करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती