Korean Love Game: ऑनलाइन गेमच्या व्यसनाला पालकांनी विरोध केल्यानंतर गाझियाबादमधील तीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. अवघे १२, १४ आणि १६ वर्ष वय असलेल्या तीन बहिणींनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच आत्महत्या करण्यामागे टास्क बेस्ड कोरियन गेम असल्याची माहिती आता समोर येत आहे. तीनपैकी एकीने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील व्यक्तीला दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून १६ वर्षांची मोठी मुलगी, तर दुसऱ्या पत्नीपासून १४ आणि १२ वर्षांची मुलगी होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी म्हटले की, मंगळवारी रात्री १२.३० वाजता तीनही बहीण एका खोलीत गेल्या. त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि पहाटे २ वाजण्याच्या सुमारास नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
कोरियन ऑनलाइन गेमचे व्यसन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही बहिणी कोरियन गेमच्या व्यसनात अडकल्या होत्या. या गेमच्या त्या इतक्या अधीन झाल्या होत्या की, त्या स्वतःला भारतीय नाही तर कोरियन समजत होत्या. तसेच त्या स्वतःला कोरियन प्रिन्सेस म्हणवून घेत होत्या.
या गेममधील टास्कमुळे त्यांनी नवव्या मजल्यावरून उडी मारली की त्यांनी खरोखरच आत्महत्या केली, याबद्दलची स्पष्टता अद्याप होऊ शकलेली नाही. अतुल कुमार सिंह म्हणाले की, ऑनलाइन टास्क गेमच्या अधीन गेल्यामुळे या मुलींचे अभ्यासातही लक्ष नव्हते. करोना काळात त्यांना हा गेम खेळण्याची सवय लागली, नंतर त्याचे रूपांतर व्यसनात झाले.
लव्ह गेम काय आहे?
या मुली मोबाइल खेळत असलेला कोरियन ‘लव्ह गेम’ हा टास्क बेस्ड गेम आहे. मुलींचे वडील चेतन कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या मुलींना या खेळाचे व्यसन जडले होते. त्या स्वतःला कोरियन असल्याचे सांगत. आम्हाला जर या खेळापासून दूर नेले तर आम्ही जीवन संपवू, असे त्या वारंवार सांगत.
पोलीस उपायुक्त निमिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये सध्यातरी गेमच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कोरियाचा लव्ह गेम असावा अशी शंका आहे. हा टास्क-आधारित इंटरॅक्टिव्ह गेम आहे. या खेळातील आभासी पात्रे आणि भावनिक कथा गुंतलेल्या आहेत. कथा पुढे नेण्यासाठी खेळाडूला टास्क पूर्ण करावे लागतात.
मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, इतर खेळांपेक्षा असे गेम वेगळे ठरतात. यात मनोरंजन आणि भावनिक बंध यातील रेषा धुसर होते. खेळाडू खेळातील आभासी पात्र आणि त्यातील कथांशी इतके एकरूप होतात की त्यांना वास्तवाचे भान राहत नाही. किशोर अवस्थेतील मुलांच्या मनावर याचा विपरित परिणाम होतो.

