पोलिसांनी एका ४२ वर्षीय इसमाला महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी आणि तिचा लैंगिक छळ होईल असं वर्तन केल्याप्रकरणी अटक केली आहे. विजय राघव असं या ४२ वर्षीय माणसाचं नाव आहे. विजय राघव हा फळांचा व्यवहाय करतो. बंगळुरुतल्या राममूर्ती नगर या ठिकाणी ही घटना घडली. महिलेने या माणसाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. जो व्हायरल झाला आणि पोलिसांनी विजय राघवला अटक केली.
नेमकं प्रकरण काय आहे?
२७ जुलैच्या दिवशी एका महिलेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ही महिला टॅक्सीची वाट बघत असते. स्कूटरवरुन जाणारा एक जण तिच्या बाजूने जातो, अश्लील वर्तन आणि हावभाव करतो. एवढंच नाही तर तुझा रेट काय असंही विचारतो? असं दिसतं आहे. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा या माणसाने तुझा रेट काय असं विचारलं तेव्हाच तिने हा व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली.ज्यानंतर तिने सगळा प्रकार तिच्या मोबाइल कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर ही महिला म्हणते की मोबाइल कॅमेरा सुरु केल्याचं जेव्हा या माणसाला कळलं तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली आणि त्याच्या स्कूटरवरुन तिथून पळून गेला. या महिलेने या माणसाचा व्हिडीओ पोस्ट केला. तसंच त्याचा स्कूटर नंबर KA 03 KQ6190 हा नंबरही रेकॉर्ड केला. त्या महिलेचं म्हणणं आहे की मी एकटी होते त्यामुळे मी घाबरले होते. हा व्हिडीओ मी त्यामुळेच शूट केला. हा व्हिडीओ महिलेने पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाला.
या महिलेने पुढे काय सांगितलं?
ही महिला तिच्या पोस्टमध्ये म्हणते, रस्त्यावर कॅबची वाट पाहात उभं राहणं हा काही गुन्हा आहे का? अचानक येऊन जर हे विचारलं जात असेल की तुझा रेट काय? तर काय वाटेल? तो माणूस ज्या काही खाणाखुणा करत होता त्या पाहून मला भीती वाटली. तसंच मला तिथे असुरक्षितही वाटू लागलं. या महिलेने सदर इसमाचा स्कूटर नंबरही नोंदवून घेतला, तसंच त्याच्या विरोधात रितसर तक्रारही नोंदवली. व्हायरल व्हिडीओ, महिलेने नोंदवलेली तक्रार आणि स्कूटर नंबर यावरुन तपास करत पोलिसांनी विजय राघवला अटक केली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितलं की आम्ही विजय राघवला अटक केली. त्याने जी स्कूटर आणली होती ती त्याची नव्हती. मात्र स्कूटर नंबर मिळाल्याने आम्हाला मदत झाली. पण आम्ही त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे.
