New Vande Mataram Guidelines Updates: केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’बद्दल नवे निर्देश जाहीर केले आहेत. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत वाजवणे अनिवार्य असणार आहे. राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे राहावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच भाग म्हणून नवी नियमावली जाहीर केली असावी, असे सांगितले जाते.

नव्या निर्देशानुसार, आता सहा कडवी असलेल्या वंदे मातरमचे ३ मिनिट १० सेकंदाचे गायन करावे लागणार आहे. यापूर्वी वंदे मातरमची दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी ६५ सेकंदाचा वेळ लागत होता. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवायचे असल्यास राष्ट्रगीत जन गण मन आधी राष्ट्रीय गीत वंदे मातरम वाजवले जाईल. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संवैधानिक संस्थांना यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

सिनेमागृहात अनिवार्य नाही

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, २८ जानेवारी रोजी केंद्र सरकारने याबाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे. १० पानांच्या निर्देशात कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम अनिवार्य असेल, त्याची यादी देण्यात आली आहे. दरम्यान सिनेमागृहाला या नियमातून वगळण्यात आले आहे.

‘वंदे मातरम’चा थोडक्यात इतिहास

‘वंदे मातरम’ हे गीत सर्वप्रथम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून ७ नोव्हेंबर १८७५ रोजी प्रसिद्ध झाले. तेव्हापासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गजर बनले. १८९६ मध्ये रवींद्रनाथ ठाकुर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत गायले गेले. त्यानंतर ते अधिकच लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे, १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात ‘वंदे मातरम’ हे गीत एका महत्त्वाच्या साधनासारखे वापरले गेले. २४ जानेवारी, १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यातील ‘वंदे मातरम’चे महत्त्व लक्षात घेता त्याला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच दर्जा असेल आणि तितकाच सन्मान केला जाईल, असे म्हटले होते. तेंव्हापासून ‘वंदे मातरम ’ला राष्ट्रगीताप्रमाणेच सन्मान प्राप्त झाला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘वंदे मातरम’वरून गोंधळ

वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २०२५ च्या अखेरीस झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरमवर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पश्चिम बंगाल राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून केंद्र सरकारने मुद्दामहून राष्ट्रीय गीताचा मुद्दा पुढे केला, असा आरोप काँग्रेसने केला होता.