Iran-America War Update : अमेरिका आणि इराणमधील प्रदीर्घ संघर्षांनंतर अखेर ८ एप्रिल रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. या युद्धविरामामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका व इराण यांच्यात आज पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये शांतता करारावर चर्चा पार पडत आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये दाखल झालं आहे. पाकिस्तानने या चर्चेला ‘इस्लामाबाद टॉक्स २०२६’ असं नाव दिलं आहे.

दरम्यान, अमेरिका-इराणमध्ये शांतता करारावर चर्चा पार पडत असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने इराणबाबत एक मोठा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायलबरोबरच्या युद्धानंतरही इराणकडे अद्याप जवळपास ५० टक्के क्षेपणास्त्रांचा साठा शिल्लक असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. या संदर्भातील वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

अमेरिका-इस्रायलबरोबरच्या युद्धात इराणचं मोठं नुकसान होऊनही इराणकडे अजूनही हजारो क्षेपणास्त्रे असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने केला. मात्र, या दाव्याला इराणने दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यानुसार, अनेक आठवड्यांच्या हल्ल्यांनंतरही इराणकडे हजारो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यापैकी बरीचशी भूमिगत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला या पार्श्वभूमीवर बोलताना म्हटलं होतं की, इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम कार्यात्मकदृष्ट्या नष्ट झाला आणि तो कमकुवत, उद्ध्वस्त आणि जवळजवळ पूर्णपणे कुचकामी झाला आहे. मात्र, पीट हेगसेथ यांच्या या वक्तव्यानंतर आता अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं की, इराणची निम्म्यापेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक यंत्रणा नष्ट झाली आहे. खराब झाली किंवा जमिनीखाली गाडली गेली. पण असं असलं तरी त्यापैकी अनेक यंत्रणा दुरुस्त केल्या जाऊ शकतात किंवा पुन्हा वापरात आणल्या जाऊ शकतात. या युद्धामुळे इराण क्षेपणास्त्रांचा साठा अंदाजे निम्मा झाला आहे. तरीही अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते इराणकडे अजूनही हजारो मध्यम आणि कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. यातील अनेक क्षेपणास्त्रे भूमिगत साठवून ठेवलेले असावेत. जी सध्याच्या हल्ल्यांपासून सुरक्षित आहेत आणि तणाव पुन्हा वाढल्यास तैनात करण्यासाठी तयार केले जाऊ शकतात.

इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे?

इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वांत घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोनचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये क्रूझ क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, तसेच २,००० किलोमीटर किंवा त्याहून अधिक पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इस्रायलसह संपूर्ण पश्चिम आशियाला कवेत घेऊ शकेल, अशी या शस्त्रांची मारक क्षमता आहे. इराणने आपल्या लष्करी कवायतीमध्ये अनेकदा आपल्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले आहे. त्यातील सेजील हे सर्वांत घातक क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २,४९४ किमी असून, ते इस्रायलपर्यंत सहज पोहोचू शकते. त्याशिवाय इराणकडे खैबर हे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता १,४९४ किमीपर्यंत आहे. इराणकडे क्रूझ क्षेपणास्त्रे आणि नौकाविरोधी क्षेपणास्त्रांचाही मोठा साठा आहे. इराणचे ‘शाहेद’ ड्रोन सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. रशिया-युक्रेन युद्धावेळी आणि सुदानमधील संघर्षातही इराणच्या ड्रोनचा वापर झाल्याचे समोर आले होते.