Rahul Gandhi reacts to Mohammad Deepak’s concerns: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच उत्तराखंडमधील जिमचालक आणि एका व्हायरल व्हिडीओमुळे ज्याला मोहम्मद दीपक नाव पडले त्या दीपक कुमारची भेट घेतली. दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीचा व्हिडीओ राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावर बुधवारी (२५ फेब्रुवारी) पोस्ट करण्यात आला.

उत्तराखंडच्या कोटद्वार येथीर रहिवासी असलेल्या दीपक कुमारने द्वेषाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन संविधान आणि तिरंग्याचा सन्मान केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात कोटद्वार येथील मुस्लीम व्यक्तीच्या कपड्याच्या दुकानात बजरंग दलाचे कार्यकर्ते धडकले होते. त्यांनी दुकानाचे बाबा नाव बदलण्याची बळजबरी केली. यावेळी दीपक कुमारने मध्यस्थी करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रोखले होते.

राहुल गांधी यांनी दीपक कुमारची भेट घेऊन त्याने द्वेषाविरोधात ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्याचे कौतुक केले. “लाखो भारतीयांच्या मनात सद्भाव आणि एकमेकांप्रती प्रेम वसलेले आहे. पण त्यांच्या डोक्यात थोडी भीतीही आहे. अशा सर्व लोकांना दीपकने एक धाडसाचा मार्ग दाखवला आहे. जे लोक समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, ते खरंतर भित्रे लोक आहेत. त्यांना घाबरण्याची कोणतीही गरज नाही”, असे राहुल गांधी म्हणाले.

दीपकने तिरंग्याचा आणि आपल्या संविधानाचा सन्मान केला. तो द्वेषाच्या विरोधात दुर्बलाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. यापेक्षा मोठी राष्ट्रभक्ती असू शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. सोमवारी (२३ फेब्रुवारी) दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दीपक कुमारचे मित्रही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान २६ जानेवारी रोजी कोटद्वारच्या बाजारात काय झाले, याची माहिती दीपकने राहुल गांधी यांना दिली. वकील अहमद नावाच्या दुकानदाराला वाचवत असताना काही जणांनी त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दीपकचे आयुष्य बदलून गेले. दीपक म्हणाला, “त्यांनी (बजरंग दलाचे कार्यकर्ते) मला माझे नाव विचारले. मी त्यांना म्हणालो, माझे नाव मोहम्मद दीपक आहे आणि मी हिंदुस्तानी आहे.”

३१ जानेवारी रोजी जिमसमोर आंदोलन

२६ जानेवारीच्या घटनेनंतर ३१ जानेवारी रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा गारमेंट्स आणि दीपक कुमारच्या जिमसमोर गोळा झाले. त्यांनी दीपक कुमार विरोधात घोषणाबाजी केली. ज्यामुळे तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना पांगवले. कोटद्वारच्या बद्रीनाथ मार्गावर असेल्या हल्क जिमचे मालक दीपक कुमार आता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. जिमच्या सभासदांची संख्या १५० वरून १५ वर आल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.