Sheikh Hasina Extradite : बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)ला स्पष्ट बहुमत मिळालं असून या पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानांच्या खूर्चीवर बसणार आहेत. दरम्यान, बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर भारताबरोबरचे संबंध सुधारणाक का याकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही देशांतील संबंध बिघडले होते. त्यातच, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख भारतातच असल्याने त्यांच्या प्रत्यार्पणाचेही प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बीएनपीचे वरिष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी महत्त्वाचं विधान केलंय. ते इंडिया टीव्हीशी बोलत होते.
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार निर्णय घेणार
फखरुल म्हणाले की, हसीनाच्या प्रत्यार्पणाबाबत कोणताही निर्णय कायदेशीर प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार घेतला जाईल. बांगलादेशने आधीच त्यांना भारतातून बांगलादेशला परत पाठवण्याची विनंती केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात मोठा हिंसाचार झाला. यामुळे हसीना शेख यांना देश सोडून भारतात पळून यावं लागलं. तेव्हापासून त्या भारतातच आश्रयास आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये, एका विशेष न्यायाधिकरणाने २०२४ च्या अशांततेदरम्यान झालेल्या हिंसक कारवाईशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
सत्तेत असताना बीएनपी अधिकृतपणे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करेल का असे विचारले असता, फखरुल यांनी सांगितले की, “या प्रकरणी कायद्याच्या चौकटीतून राहून निर्णय घेतला जाईल.” बांगलादेश आणि भारतामध्ये आधीच प्रत्यार्पण करार आहे हे त्यांनी मान्य केले.
भारत-बांगलादेश संबंध बिघडणार?
प्रत्यार्पणाच्या मुद्द्यामुळे नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंध सामान्य होण्यावर परिणाम होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना फखरुल म्हणाले, “बांगलादेश आणि भारताच्या संबंधांमध्ये हा अडथळा ठरणार नाही. भारताने कधीही शेख हसीना भारतात असल्याचे नाकारलेले नाही. आणि त्यांनी कधीही म्हटले नाही की भारत हसीनाला परत करणार नाही. हे सर्व त्या वेळी होणाऱ्या प्रयत्नांवर अवलंबून असेल. या सर्वाला वेळच उत्तर देईल”, असं ते म्हणाले.
फखरुल हे बीएनपीच्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि तारिक रहमान यांचे जवळचे सहकारी आहेत. त्यांनी अनेक दशके बांगलादेशात पक्षाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये रहमान यांच्या इंग्लंडमधील निर्वासनाच्या काळातही समावेश आहे.

