आत्मनिर्भर टर्की; WhatsApp वर टाकला बहिष्कार, राष्ट्राध्यक्षांनीही सुरु केला ‘या’ ‘मेड इन टर्की’ अ‍ॅपचा वापर

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनीच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर बंद करण्याचे आदेश दिले

(मूळ फोटो : रॉयटर्स आणि एपी)

टर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर टर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भात धोरणामध्ये बदल केला. या नवीन धोरणांमधील अटी मान्य नसतील तर यूझरचे अकाऊंट डिलीट केलं जाईल असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन अटी आणि धोरणांसाठी मंजुरी दिल्यानंतर यूझर्सची संपूर्ण खासगी माहिती फेसबुकबरोबरच कंपनीच्या इतर फ्लॅटफॉर्मवर शेअर केली जाईल. मात्र यामुळे अनेक युझर्स आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : WhatsApp च्या नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी ११ जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या बीपवर (BiP) ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे टर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अ‍ॅप असून या अ‍ॅपची मालकी तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या टर्कीमधील कंपनीकडेच आहे. टर्कीमध्ये आता या बीप अ‍ॅपवरुनच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना केल्या जातील. राष्ट्राध्यक्षांनी व्हॉट्सअ‍ॅप सोडल्याची घोषणा केल्यानंतर देशामध्ये अमेरिकन कंपनीच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपसंदर्भात आवाज उठू लागला आहे. देशातील लाखो व्ह़ॉट्सअ‍ॅप युझर्सने व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन बीपकडे आपला मोर्चा वळवला आहे. तुर्कसेल कंपनीने रविवारी दिलेल्या माहितीनुसार २४ तासांमध्ये १० लाखांहून अधिक नवीन युझर्सने हे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. २०१३ साली लॉन्च करण्यात आलेलं हे अ‍ॅप ५३ लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केलं असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपला होत असणारा विरोध बीपसाठी फायद्याचा ठरत असल्याचे दिसत आहे. देशी बनावटीच्या अ‍ॅपला टर्कीमधील जनता आता प्राधान्य देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

आणखी वाचा- Signal ची लॉटरी लागली! लोकप्रियता प्रचंड वाढली, एलन मस्कनंतर पेटीएम सीईओही म्हणाले ‘Signal वापरा’

व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन धोरणांचा स्वीकार करण्यासंदर्भात नोटीफिकेशन युझर्सला पाठवलं जातं. मात्र युझर्सने आठ फेब्रुवारीपर्यंत या धोरणांना होकार दिला नाही तर त्याचे अकाऊंट डीलिट केलं जाईल. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणांमुळे खासगी माहितीला असणारा धोका वाढणार आहे. ही माहिती इतर प्लॅटफॉर्मवर शेअर केली जाणार असून सर्वच माहितीवर कंपनीची बारीक नजर असणार आहे, असंही सांगितलं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp gets dumped by turkish president erdogan over privacy concerns scsg

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या