जुन्या स्मार्टफोनवरील व्हाट्सअॅप सेवा बंद करण्यात आली आहे. अॅंड्रॉइड २.२ फ्रोयो, जुने अॅंड्रॉइड डिव्हाइस, आयफोन ३ जीएस किंवा आयओएस ६ या डिव्हाइस वर चालत असलेली व्हाट्सअॅप सेवा नव्या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय व्हाट्सअॅप कंपनीने घेतला आहे. वरील सर्व उपकरणे ही सात किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे जुनी होती. त्यामुळे या उपकरणांवरुन व्हाट्सअॅप सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपकरणांवर जुनी प्रणाली आहे. त्यामुळे सुरक्षेची सर्व व्यवस्था या उपकरणांवर नाही त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे व्हाट्सअॅपने म्हटले.
व्हाट्सअॅपला नुकतीच सात वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहमी अद्ययावत टेक्नॉलॉजीचा आपल्या फीचर्समध्ये समावेश करण्यासाठी व्हॉट्सअॅप प्रसिद्ध आहे. त्यातूनच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात बाजारात सात वर्षे टिकून राहणे हे खरं तर फार मोठं आव्हान आहे. ग्राहकांना एकमेकांशी सातत्याने संवाद साधता यावा या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय व्हाट्अॅपने या काळात घेतले आहे. परंतु, त्याबरोबरच ग्राहकांची सुरक्षितता जपणे याला देखील आम्ही प्राधान्य देतो असे व्हाट्सअॅपने सांगितले. त्यामुळेच व्हाट्अॅपने जुन्या स्मार्टफोन डिवायसेसवरुन ही सुविधा हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
२००९ ला जेव्हा आम्ही व्हाट्सअॅप सुरू केले तेव्हा दिसणारी उपकरणे ही आताच्या उपकरणांपेक्षा खूप वेगळी होती. अॅप्पलचे अॅप स्टोअर तर नुकतेच ग्राहकांसाठी खुले झाले होते. त्यावेळी ७० टक्के स्मार्टफोन्सवर ब्लॅकबेरी आणि नोकिया या कंपन्यांद्वारे दिल्या गेल्या ऑपरेटिंग सिस्टम्स वापरल्या जात होत्या, असे स्पष्टीकरण व्हाट्सअॅपने दिले आहे. आज गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर चालणाऱ्या स्मार्टफोन्सनी ९९.५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे, असे त्यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकांद्वारे गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टम्सचा वापर केला जातो म्हणून २०१६ च्या अखेरीस या व्यतिरिक्त ऑपरेटिंग सिस्टम्सवर व्हाट्सअॅप सुविधा न देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस ४०, नोकिया सिम्बियन एस ६०, अॅंड्रॉइड २.१ आणि आणि अॅंड्रॉइड २.२ वर चालणारे स्मार्टफोन, विंडोज फोन ७, आयफोन ३ जीएस/आयओएस ६ या उपकरणांवर २०१६ नंतर व्हाट्सअॅप वापरता येणार नाही अशी घोषणा व्हाट्सअॅप कंपनीने केली आहे. भविष्य काळात व्हाट्सअॅप सुविधा विस्तारण्याचा संकल्प कंपनीने केला आहे तेव्हा या उपकरणांवर ती सुविधा मिळणे अशक्य असल्याचे कंपनीने सांगितले. असे असले तरी ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस ४०, नोकिया सिम्बियन एस ६० या उपकरणांना ३० जून २०१७ पर्यंत सपोर्ट दिला जाईल असा खुलासा कंपनीने केला आहे.