पीटीआय, नवी दिल्ली

वापरकर्त्यांचा फोन क्रमांक उघड न करता केवळ युजरनेम वापरण्याचे नवे वैशिष्ट्य (फीचर) आणण्याचे व्हॉट्सॲपने जाहीर केले आहे. मात्र, यामुळे सायबर घोटाळे, फसवणूक आणि तोतयागिरीचे प्रकार वाढण्याची चिंता व्यक्त करत केंद्र सरकारने ‘मेटा’ला नोटीस बजावली आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी या विषयावर सखोल चर्चा होईपर्यंत हे फीचर सुरू न करण्याचे निर्देश केंद्राने दिले.

व्हॉट्सॲपने दोन दिवसांपूर्वी ‘युजरनेम’ फीचर सुरू करण्याची घोषणा केली होती. यामुळे वापरकर्त्यांना युजरनेम निवडण्याची आणि दुसर्‍या वापरकर्त्याशी संपर्क साधताना त्याचा मोबाइल क्रमांक लपवण्याची परवानगी दिली जाणार आहे. युजरनेममुळे मोबाइल क्रमांक जाहीर न करता संवाद साधता येणार आहे. मोबाइल क्रमांक खासगी ठेवून इतरांना संदेश किंवा कॉल करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. मात्र त्यामुळे ऑनलाइन फसवणूक, डिजिटल ॲरेस्ट किंवा सायबर गुन्हे यांमध्ये वाढ होऊ शकते, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली.

वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे ‘युजरनेम’बाबत चिंता व्यक्त केली. सरकार या नव्या फीचरचे जोखीम मूल्यांकन करेल आणि ते सध्याच्या कायदेशीर रचनेचे उल्लंघन करते की नाही हे पाहिले जाईल, असे या अधिकार्‍याने सांगितले. सरकारने ‘मेटा’ला पुढील तीन दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे आणि या विषयावर चर्चा पूर्ण होईपर्यंत हे फीचर सुरू न करण्याचे निर्देश दिले.

आवश्यक सुरक्षा उपाययोजना, ‘व्हॉट्सॲप’चे निवेदन

केंद्र सरकारच्या नोटिशीनंतर व्हॉट्सॲपने एक निवेदन प्रसिद्ध केले. ते या वर्षाच्या उत्तरार्धात हे फीचर टप्प्याटप्प्याने आणण्याची योजना आखत आहेत. या फीचरसाठी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना केल्याचेही व्हॉट्सॲपने या निवेदनात स्पष्ट केले.

तोतयागिरीपासून संरक्षण करण्यासाठी, आम्ही अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था, सेलिब्रिटी आणि व्हेरिफाईड ‘मेटा’ खाती यांसारख्या महत्त्वाच्या नावांचे हक्क राखून ठेवले आहेत; जेणेकरून ती नावे केवळ त्यांच्या अधिकृत मालकांनाच मिळतील. तसेच प्रसिद्ध नावांसारखी दिसणारी इतर नावेही राखून ठेवण्यात आली आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वापरकर्त्यांना अजूनही मोबाइल क्रमांकाची आवश्यकता असेल आणि ‘युजरनेम’ वापरताना फसवणूक रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक स्तर तयार केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

इतर वापरकर्त्यांना तुम्हाला संदेश पाठवण्यासाठी तुमचे नेमके युजरनेम माहीत असणे आवश्यक असेल. एखादे खाते किती नव्या लोकांशी संपर्क साधू शकते यावर आम्ही मर्यादा घालू, एखाद्याचे युजरनेम ओळखण्याचे वारंवार होणारे प्रयत्न रोखू आणि तोतयागिरी व गैरवापराचे सामान्य प्रकार दर्शविणार्‍या हालचाली शोधून त्या काढून टाकणारी यंत्रणाही कार्यान्वित करू, असे व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने सांगितले.