WhatsApp Username Feature security analysis and Cyber Fraud Risk: सोशल मीडिया क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. व्हॉट्सॲप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फिचरनुसार, आता युजर्सना एकमेकांशी चॅट करण्यासाठी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही, तर ते ‘युझरनेम’द्वारे एकमेकांशी कनेक्ट राहू शकतील. कंपनीने याला प्रायव्हसीच्या दृष्टीने मोठे पाऊल म्हटले असले, तरी भारत सरकाराला मात्र या फिचरमुळे ऑनलाईन फसवणूक वाढण्याची भीती आहे. या फिचरमुळे सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी भीती केंद्र सरकारला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या या आगामी ‘युझर आयडी’ फिचरची सखोल तपासणी करणार आहे. आवश्यकतेनुसार, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी ‘मेटा’ ला या संदर्भात नोटीस पाठवून स्पष्टीकरणही मागितलं जाऊ शकतं.

काय आहे व्हॉट्सॲपचे नवीन फिचर?

मेटा कंपनीच्या दाव्यानुसार, हे फिचर युजर्सच्या फोन नंबरची गोपनीयता जपण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सध्याच्या सुविधेत, जर एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे किंवा व्यवसाय करणाऱ्या कंपनीकडे तुमचा मोबाईल नंबर असेल, तर ते थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतात. नवीन फिचर आल्यानंतर जगातील ३ अब्जाहून अधिक व्हॉट्सॲप युजर्स आपला फोन नंबर शेअर न करताही एकमेकांशी संवाद साधू शकतील. सुरक्षेसाठी व्हॉट्सॲप युजर्सना युनिक युझरनेम सुचवणारे ‘युझरनेम जनरेटर’ टूल देखील देणार आहे.

सरकार आणि तज्ज्ञांची चिंता का वाढली?

व्हॉट्सॲप याला ‘प्रायव्हसी’ म्हणत असले, तरी अनेक टेक तज्ज्ञांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे उदाहरण देत तज्ज्ञांनी म्हटले आहे की, फोन नंबर नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांना ओळख लपवणे अधिक सोपे होईल.

“मोबाईल नंबरमुळे एक प्रकारची जबाबदारी निश्चित होते. तुम्हाला कोण मेसेज करतंय हे माहित असतं आणि फसवणूक झाल्यास पोलिसात तक्रार करण्यासाठी एक नंबर उपलब्ध असतो. युझरनेममुळे प्रायव्हसी नक्कीच वाढेल, पण गुन्हेगारांची भीती कमी होईल आणि सायबर चोरांना नेमकं हेच हवं असतं.” – जसवीर सिंग, सीईओ (KnotDating)

इतर सोशल मीडिया युजर्सनीही भीती व्यक्त केली आहे की, मोबाईल नंबर नसल्यामुळे तपास यंत्रणांना सायबर गुन्ह्यांचा छडा लावणे कठीण होईल. अलीकडेच NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या प्रकरणात टेलिग्राम ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे समोर आले होते. टेलिग्रामवरही युझरनेमच्या आधारे ओळख लपवता येत असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

नामवंत व्यक्तींच्या नावाने फसवणुकीचा धोका

प्रसिद्ध उद्योजक आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू यांनीही यावर धोक्याची घंटा वाजवली आहे. सायबर चोर नामांकित व्यक्तींच्या नावाशी मिळतंजुळतं युझरनेम तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  • उदाहरणादाखल: जर एखाद्याचे अधिकृत युझरनेम ‘warikoo’ असेल, तर स्कॅमर्स ‘wariko’ किंवा ‘awarikoo’ अशी नावे तयार करून लोकांना जाळ्यात ओढू शकतात.
  • भारतात जर व्हॉट्सॲपनं या गैरवापराला रोखण्यासाठी कडक पावले उचलली नाहीत, तर ही सिस्टीम डोकेदुखी ठरू शकते, असं वारिकू यांनी म्हटलं आहे.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही यावर सूचक ट्विट करत म्हटले आहे की, “लवकरच व्हॉट्सॲपवर व्हेरिफाइड युझरनेम मिळतील आणि त्यानंतर त्याच नावाशी मिळतेजुळते अनव्हेरिफाइड युझरनेम्स येतील, ज्याचा परिणाम…”

कसं काम करणार हे नवीन फिचर?

  • युनिक नाव: प्रत्येक युझरला ३ ते ३५ कॅरेक्टर्सच्या मर्यादेत आपले स्वतंत्र युझरनेम निवडावे लागेल.
  • युझरनेम की: जर एखाद्याला तुमच्याशी पहिल्यांदाच संपर्क साधायचा असेल, तर त्याला तुमचे युझरनेम माहित असणे आवश्यक असेल. याशिवाय, सुरक्षेचा दुसरा स्तर म्हणून युजर्स एक ‘की’ (पासवर्डसारखा कोड) सेट करू शकतील. हा कोड असल्याशिवाय समोरचा व्यक्ती मेसेज करू शकणार नाही. हा कोड कधीही बदलता येईल.
  • नंबर दिसणार नाही: हे फिचर पूर्णपणे लागू झाल्यानंतर, पहिल्यांदा मेसेज करताना समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर अजिबात दिसणार नाही.

व्हॉट्सॲपचे हे नवीन फिचर युजर्सची सुरक्षा वाढवणार की सायबर चोरांचे बळ वाढवणार, यावर आता तंत्रज्ञान क्षेत्रात आणि सरकारी पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.