How To Reserve WhatsApp Username Step By Step: आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सॲपने (WhatsApp) आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता व्हॉट्सॲपवर कोणाशीही चॅट करण्यासाठी किंवा ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. कारण, व्हॉट्सॲप लवकरच युझर्ससाठी ‘युझरनेम’ (Username) हे भन्नाट फिचर घेऊन येत आहे. व्हॉट्सॲपचे सीईओ कुणाल शाह यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युझर्सनी त्यांचे आवडते नाव आताच आरक्षित (Reserve) करून ठेवावे, असे आवाहन केले आहे.
सुरक्षिततेच्या(प्रायव्हसीच्या) दृष्टीने सर्वात मोठा बदल
आतापर्यंत व्हॉट्सॲपवर नवीन व्यक्तीशी संवाद साधायचा असल्यास मोबाईल नंबर देणे अनिवार्य असायचे. यामुळे अनेकदा युझर्सची वैयक्तिक माहिती अनोळखी लोकांपर्यंत पोहोचत असे, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. व्हॉट्सॲपने हीच अडचण ओळखून आता इन्स्टाग्राम आणि ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) प्रमाणे युझरनेमचे फिचर आणले आहे. यामुळे युझर्सना त्यांची प्रायव्हसी अधिक चांगल्या प्रकारे राखता येईल.
व्हॉट्सॲपने २९ जूनपासून जागतिक स्तरावर युझरनेम रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. संपूर्ण जगात हे फिचर उपलब्ध होण्यापूर्वी युझर्सना त्यांचे आवडते युझरनेम बुक करता येणार आहे.
व्हॉट्सॲपचे सीईओ कुणाल शाह यांनी काय म्हटले?
व्हॉट्सॲपचे सीईओ कुणाल शाह यांनी ‘X’ वर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “वेळेला खूप महत्त्व आहे. हे फिचर संपूर्ण जगासाठी रोलआउट होण्यापूर्वीच मी व्हॉट्सॲपवर माझे युझरनेम बुक केले आहे. आता तुमची वेळ आहे, तुमचे आवडते युझरनेम त्वरित मिळवा.”
पण, व्हॉट्सॲपला युझरनेमची गरज का पडली?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, याचे मुख्य कारण म्हणजे ‘युझर प्रायव्हसी’. अनेकदा ऑफिसमधील नेटवर्किंग इव्हेंट्स, कॉलेजचे नवे मित्र, सोसायटीतील शेजारी किंवा मुलांच्या शाळेतील पालकांचे ग्रुप्स यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर शेअर करावा लागतो. अशा वेळी अनेकदा वैयक्तिक नंबर शेअर करण्याची इच्छा नसते.
आता युझरनेम आल्यामुळे तुम्ही मोबाईल नंबरऐवजी फक्त तुमचे युझरनेम समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. विशेष म्हणजे, हे फिचर इन्स्टाग्राम किंवा ‘X’ सारखे सोशल मीडिया हँडल नसेल. व्हॉट्सॲपवर कोणाचाही युझरनेम शोधण्यासाठी कोणतीही सार्वजनिक डिरेक्टरी (Public Directory) नसेल. तसेच व्हॉट्सॲप कोणालाही युझरनेम सुचवणार नाही. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुमचे अचूक युझरनेम माहीत असणार नाही, तोपर्यंत ती तुम्हाला मेसेज करू शकणार नाही.
सुरक्षिततेसाठी ‘युझरनेम की’ (Username Key) कवच
सुरक्षितता आणखी मजबूत करण्यासाठी व्हॉट्सॲप ‘युझरनेम की’ हे अतिरिक्त फिचर देत आहे. हा एक प्रकारचा सिक्युरिटी कोड असेल. जर एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या युझरनेमद्वारे पहिल्यांदाच संपर्क साधत असेल, तर त्याला हा कोड टाकावा लागेल. हा कोड तुम्ही कधीही बदलू शकता, ज्यामुळे तुमच्या व्हॉट्सॲपवर कोणाचे मेसेज यावेत यावर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल.
तुमचे व्हॉट्सॲप युझरनेम असे करा रिझर्व्ह (Step-by-Step):
जर तुमच्या भागात हे फिचर उपलब्ध झाले असेल, तर तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून युझरनेम बुक करू शकता:
- स्टेप १: सर्वात आधी तुमचे व्हॉट्सॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून अपडेट करा.
- स्टेप २: व्हॉट्सॲप ओपन करून ‘Settings’ मध्ये जावा.
- स्टेप ३: तिथे ‘Account’ या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ४: आता ‘Username’ हा पर्याय निवडा.
- स्टेप ५: तुमचे आवडते आणि उपलब्ध (Available) असलेले युझरनेम टाकून कन्फर्म करा. महत्त्वाची टीप: व्यावसायिक (Businesses) आणि कंटेट क्रिएटर्सना त्यांच्या इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंटशी जुळणारे युझरनेम निवडता येणार आहे. हे युझरनेम जास्तीत जास्त ३५ अक्षरांचे असू शकते. तसेच, सेलिब्रिटी आणि नामांकित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांचे युझरनेम व्हॉट्सॲपकडून आधीच राखून ठेवले जातील.

जुने चॅट्स आणि नंबरचे काय होणार?
या नवीन फिचरमुळे तुमच्या सध्याच्या चॅट्सवर कोणताही परिणाम होणार नाही. तुमचे जुने कॉन्टॅक्ट्स आधीप्रमाणेच मोबाईल नंबरद्वारे तुमच्याशी संवाद साधू शकतील. तसेच ब्लॉक करणे, रिपोर्ट करणे आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-End Encryption) यासारखे सुरक्षिततेचे नियम आधीसारखेच लागू राहतील.
हे फिचर कधीपर्यंत मिळणार?
हे फिचर सध्या टप्प्याटप्प्याने रोलआउट केले जात आहे. त्यामुळे सर्व युझर्सना ते लगेचच दिसणार नाही. तुमच्या भागात हे फिचर उपलब्ध होताच तुम्हाला व्हॉट्सॲपच्या आत एक ‘इन-ॲप नोटिफिकेशन’ (In-app Notification) मिळेल. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे फिचर जगभरातील सर्व युझर्ससाठी पूर्णपणे उपलब्ध करून दिले जाईल.
