WhatsApp Web Group Calling feature for 32 people update: स्मार्टफोनच्या माध्यमातून जगाला जोडणारे लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’आपल्या वेब युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. ऑफिसमध्ये काम करताना किंवा लॅपटॉपवर व्यस्त असताना व्हॉट्सॲपवर ग्रुप कॉल आला की, अनेकदा आपल्याला मोबाईल हातात घ्यावा लागतो. पण आता ही कसरत लवकरच बंद होणार आहे. ‘व्हॉट्सॲप वेब’ युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲप आता आपल्या वेब व्हर्जनवर थेट ग्रुप कॉलिंगचे फिचर घेऊन येत आहे. या नव्या सुविधेमुळे युजर्सना मोबाईल किंवा डेस्कटॉप ॲपशिवाय, थेट ब्राउझरवरूनच तब्बल ३२ जणांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलवर जोडले जाता येणार आहे.
व्हॉट्सॲपच्या घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या ‘WABetaInfo’ या प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे फिचर चाचणीच्या (Beta Testing) टप्प्यात असून काही निवडक बीटा युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. या नव्या अपडेटमुळे व्हॉट्सॲप वेब आणि मोबाईल ॲपमधील अंतर आता जवळपास संपुष्टात येणार आहे.
आतापर्यंत व्हॉट्सअॅप वेबवर फक्त दोन व्यक्तींमध्येच व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सोय होती. मात्र, या नव्या अपडेटमुळे आता मोबाईल आणि डेस्कटॉप अॅपप्रमाणेच ब्राउझरवरही ग्रुप कॉलिंगचा आनंद घेता येईल.
एकाच वेळी ३२ जण होणार सामील! कसे काम करणार हे फिचर?
व्हॉट्सअॅपने केलेल्या बदलांवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे फिचर काही निवडक ‘बीटा टेस्टर्स’साठी (Beta Testers) रोलआउट करण्यात आले आहे.
- कॉलिंग आयकॉन: हे फिचर मिळाल्यानंतर युजर्सना व्हॉट्सअॅप वेबवरील ग्रुप चॅट विंडोमध्ये वरच्या बाजूला एक कॉलिंग आयकॉन दिसेल.
- निवडक सदस्यांना कॉल: या आयकॉनवर क्लिक करून युजर्स व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलचा पर्याय निवडू शकतात. विशेष म्हणजे, ग्रुपमधील सर्वांना कॉल न लावता, केवळ ठराविक सदस्यांना निवडून कॉल करण्याची सोयही यात देण्यात आली आहे.
- ३२ लोकांची मर्यादा: मोबाईल अॅपप्रमाणेच वेब व्हर्जनवरही एकाच वेळी तब्बल ३२ जण ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतील.
‘स्क्रीन शेअरिंग’ आणि ‘वेटिंग रूम’सह मिळणार अनेक प्रगत फिचर्स
ऑफिसचे काम करणाऱ्या आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे अपडेट अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः ‘लिनक्स’ (Linux) ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या युजर्ससाठी, ज्यांच्याकडे व्हॉट्सअॅपचे अधिकृत डेस्कटॉप अॅप नाही, त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल. या अपडेटमध्ये खालील फीचर्सचा समावेश असेल:
- स्क्रीन शेअरिंग (Screen Sharing): व्हिडिओ कॉल दरम्यान युजर्सना आपल्या कॉम्प्युटरची स्क्रीन शेअर करता येईल. यामुळे ऑफिसचे प्रेझेंटेशन, डॉक्युमेंट्स किंवा स्लाईड्स दाखवणे सोपे होईल. (हे फिचर फक्त व्हिडिओ कॉल पुरतेच मर्यादित असेल).
- कॉल लिंक्स (Call Links): युजर्स ग्रुप कॉलिंगसाठी एक स्वतंत्र लिंक तयार करून इतरांना पाठवू शकतील. या लिंकवर क्लिक करून कोणीही कॉलमध्ये थेट जॉईन होऊ शकेल. वापरात नसलेली लिंक ३० दिवसांनंतर आपोआप एक्स्पायर (नष्ट) होईल.
- वेटिंग रूम (Waiting Room): कॉलमध्ये कोणी प्रवेश करावा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वेटिंग रूम’चे फिचरही देण्यात आले आहे.
सुरक्षेची पूर्ण हमी: कॉलिंग असणार ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या गोपनीयतेची यात पूर्ण काळजी घेतली आहे. वेब व्हर्जनवरील हे ग्रुप कॉल्स ‘सिग्नल प्रोटोकॉल’वर आधारित ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ (End-to-End Encrypted) असतील. याचा अर्थ असा की, कॉलवरील संभाषण फक्त त्या ग्रुपमधील सदस्यांनाच ऐकू किंवा पाहू जाईल. अगदी व्हॉट्सअॅपकडे किंवा त्याची मूळ कंपनी ‘मेटा’कडेही (Meta) हा डेटा जाणार नाही.
सर्वसामान्यांना कधी मिळणार हे फिचर?
सध्या हे फिचर चाचणीच्या (Beta Version) टप्प्यात असून केवळ मर्यादित युजर्सना देण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यांत सर्व त्रुटी दूर करून हे फिचर जगभरातील सर्व सामान्य युजर्ससाठी रोलआउट केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजून हे फिचर दिसत नसेल, तर पुढील काही अपडेट्सची वाट पाहावी लागेल.
