अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तसे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मात्र व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांचा तोल ढासळला आणि त्यांनी एका महिलेला सभागृहाबाहेर हाकलण्याचे फर्मान सोडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
ओबामांचे भाषण सुरू असताना मध्येच त्यांना एका महिलेने एलजीबीटी स्थलांतरितांच्या प्रश्नावरून छेडले व वारंवार त्यांना प्रश्न विचारू लागली. यावर ओबामांनी त्रस्त होत ‘नको, नको, तुम्हाला असे वागताना लाज वाटायला हवी, तुम्ही असे वागू शकत नाही. तुम्ही माझ्या घरामध्ये आलात. एखाद्याने तुम्हाला निमंत्रण दिले, तर तेथे जाऊन तुम्ही अशोभनीय वागू शकत नाही’, अशा शब्दांत तिला फटकारले.
एवढे बोलूनही ती महिला शांत न बसल्याने शेवटी वैतागून ओबामांनी त्या महिलेला बाहेर काढण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना दिले.
अमेरिकेतील राज्यांना अनुदान देण्याचा आरोग्य कायद्याचा निर्णय कायम
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आणलेल्या आरोग्यविषयक कायद्यांतर्गत (हेल्थकेअर अ‍ॅक्ट) देशातील राज्यांना करविषयक अनुदान देण्याचा निर्णय देशाच्या सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कायम ठेवला. अध्यक्षांचा हा मोठा विजय मानला जात आहे. ‘ओबामा केअर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या २०१० सालच्या ‘अ‍ॅफोर्डेबल केअर अ‍ॅक्ट’ ला न्यायालयाने ६-३ अशा मतांनी मान्यता दिली. यामुळे स्वत:चे ऑनलाइन हेल्थकेअर एक्स्चेंजेस स्थापन करणाऱ्या राज्यांना अनुदान मिळण्यावर र्निबध येणार नाहीत. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स, कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह न्यायाधीश अँथनी केनेडी आणि न्यायालयाचे लिबरल सदस्य यांनी बहुमताने हा निर्णय दिला.