नाशिकमधील पिंपळगाव येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पाडली. व्यासपीठावर मोदींचे भाषण सुरु झाल्यानंतर काही मिनिटात सभेला जमलेल्या लोकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. मोदी भाषण करत असताना अनेक लोक सभा सोडून बाहेर पडत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. असाच प्रकार विदर्भातील गोंदियामध्येही घडला होता. मोदी भाषण करत असताना लोक बाहेर पडत होते.

काय म्हणाले मोदी पिंपळगावच्या सभेत
भाजपा जर पुन्हा सत्तेत आली तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेचा फायदा दिला जाईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमीनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत केली. महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, २३ मेला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी जर मोदी सरकार सत्तेत आले तर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेची मदत दिली जाईल. त्यासाठी किमान पाच एकर जमिनीचा नियम हटवला जाईल. कांदा उत्पादकांसाठी स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था निर्माण केली जाईल.

शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, या समस्येचे खरे कारण ग्राहक नाही तर दलाल आहेत. आमच्या सरकारने या दलालांविरोधातच लढाई छेडली आहे. या दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. त्यामुळे यापुढे आता शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय कोणीही काहीही करु शकणार नाही, असे मोदी म्हणाले.