Chicago University Party Assault Case: अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या आवारातील एका विद्यार्थी संघटनेच्या पार्टीदरम्यान एका २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बंद बाथरूममध्ये या तरुणीवर अत्याचार सुरू असताना बाहेर उभे असलेले काही तरुण ‘माझी पाळी कधी येणार?’ आणि ‘मलाही आत जायचे आहे’, अशा घोषणा देत जल्लोष करत होते, अशी माहिती पीडितेच्या मैत्रिणीने दिली. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
रविवारच्या पहाटे ‘अल्फा एप्सिलॉन पाय’ या संघटनेच्या बंगल्यात ही घटना घडली. पीडित तरुणी आणि संशयित आरोपी या दोघांचाही युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोशी थेट संबंध नसून ते तिथले विद्यार्थी नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणातील एका संशयित व्यक्तीची ओळख पटवून त्याला कॅम्पसमध्ये प्रवेशास बंदी घातली आहे. तसेच या प्रकाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मैत्रिणीने दरवाजा तोडला अन्…
पीडितेची २१ वर्षीय मैत्रीण मिया लारा हिने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका जाहिरातीवरून त्या तिघी मैत्रिणी या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. तळघरात नाचत असताना काही वेळातच पीडित तरुणी तिच्या इतर मैत्रिणींपासून वेगळी झाली. ती एका तरुणाबरोबर असल्याचे दिसून आले होते. बराच वेळ ती न दिसल्याने लारा तिचा शोध घेऊ लागली.
त्या वेळी एका बंद बाथरूमबाहेर काही तरुणांचा घोळका उभा असल्याचे लाराच्या निदर्शनास आले. हे तरुण बाहेरून जल्लोष करत आत जाण्यासाठी ओरडत होते. संशय आल्याने लाराने तातडीने दरवाजावर जोर देऊन तो उघडला. आतमध्ये पीडित तरुणी विवस्त्र अवस्थेत जमिनीवर कोसळलेली होती आणि तो तरुण तिचे हात पकडून होता. “मला इथून बाहेर काढ, हे थांबवा,” अशी याचना पीडित तरुणी करत होती, असे लाराने सांगितले.
लाराने आरडाओरड सुरू करताच आरोपी पसार झाला. त्यानंतर मैत्रिणींनी पीडितेला बाहेर काढले. लाराने घराबाहेर पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करत त्याला जाब विचारला. त्या वेळी त्याने “तिची संमती होती,” असा दावा केला आणि तो पसार झाला. या संवादाचा व्हिडिओही समोर आला आहे. कॅम्पस पोलिसांनी तत्काळ तिघींना शिकागो विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल केले; तिथे पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या घटनेनंतर संबंधित संघटनेने सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध करून या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संघटनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, संशयित तरुण त्यांच्या संघटनेचा सदस्य नाही आणि संघटनेतील कोणत्याही विद्यार्थ्याचा या प्रकारात सहभाग नाही. विद्यापीठाने स्पष्ट केले की या संघटना थेट विद्यापीठाशी संलग्न नसल्या, तरी त्या विद्यापीठाच्या आचारसंहितेच्या कक्षेत येतात. तपास पूर्ण होईपर्यंत या शाखेला कोणतेही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
