कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना मात्र वृत्तवाहिनीचे वार्ताहर म्हणून लाभ झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे संसदेतून बाहेर पडताच चिदम्बरम यांनी एका वार्ताहराच्या हातातील माइक घेऊन तो जसवंतसिंग यांच्यासमोर प्रतिक्रियेसाठी धरल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.

कर्नाटकमधील विजयाचे श्रेय तुम्ही काँग्रेसला देणार नाही का, असा सवालही चिदम्बरम यांनी जसवंतसिंग यांना केला. वास्तविक पाहता चिदम्बरम यांना वार्ताहरांकडून कर्नाटकच्या निकालाबाबत प्रश्न विचारले जात होते.

तेव्हा त्यांनी जसवंतसिंग यांना संसदेतून बाहेर पडताना पाहिले. ती संधी साधून चिदम्बरम यांनी वार्ताहराच्या हातातील माइक घेतला आणि जसवंतसिंग यांनाच थेट प्रश्न केला.

त्यानंतर चिदम्बरम यांनी पुन्हा माइक वार्ताहराच्या हातात देताना, जसवंतसिंग हे सभ्य गृहस्थ असल्याचे, नमूद केले. कर्नाटकचा निकाल हा सर्व राजकीय पक्षांसाठी एक संदेश आहे.

जनतेचे सर्वाच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष आहे, असे चिदम्बरम यांनी प्रतिक्रिया देताना त्यानंतर स्पष्ट केले. उत्तम कारभारालाच जनता मत देते आणि तुम्ही उत्तम कारभार थांबविला तर तीच जनता तुम्हाला अव्हेरते, अशी प्रतिक्रिया त्यानंतर जसवंतसिंग यांनी दिली.