पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या सुरूवातीस, देशवासीयांना उद्देशून ऑलिम्पिकशी संबंधित काही प्रश्न विचारले, तसेच भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो! नेहमीच ‘मन की बात’ मध्ये, आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. ह्या वेळी मला वाटले, काहीतरी वेगळे करावे, मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका! ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत? ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? मित्रांनो, उत्तरे मला पाठवू नका, परंतु  My Gov मध्ये जर आपण ऑलिंपिकवरील प्रश्नोत्तरी मधील प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण खूप सारी बक्षीसे जिंकू शकाल. My Gov च्या ‘रोड टू टोकियो’ या प्रश्नमंजुषेत असे अनेक प्रश्न आहेत. आपण ‘रोड टू टोकियो’ प्रश्नमंजुषेत भाग घ्या. भारताने यापूर्वी कशी कामगिरी केली आहे? आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे?  हे स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की, आपण या प्रश्नमंजुषेत स्पर्धेत नक्की भाग घ्या.”

“जेव्हा टोकियो ऑलिम्पिकबद्दल बोलत आहोत, तेव्हा महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोण विसरू शकतं? काही दिवसांपूर्वीच करोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतलं. जेव्हा ते रूग्णालयात होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. बोलताना मी त्यांना आग्रह केला होता, मी म्हणालो होती की तुम्ही तर १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे आता आपले खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत, तर तुम्हाला आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे, त्यांना आपल्या संदशाने प्रेरीत करायचं आहे. ते खेळा विषयी एवढे समर्पित व भावूक होते, की आजारपणातही त्यांनी तत्काळ यासाठी होकार दिला. मात्र दुर्दैवाने नियतीला आणखी काही वेगळं मान्य होतं.”

“मला आजही आठवतं २०१४ मध्ये ते सुरतला आले होते, आम्ही एका नाईट मॅरेथॉनचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांच्याशी जी चर्चा झाली. खेळांबद्दल जे बोलणं झालं त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मिल्खा सिंग यांचं संपूर्ण कुटुंब खेळाला समर्पित होतं. भारताचा गौरव वाढवत राहिलं आहे. मित्रानो, मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडूवृत्ती एकत्र येते, तेव्हा कुठे एखादा ‘ विजेता’ तयार होतो.  आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, खेड्यातून येतात. आपला जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे.” असं देखील मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.