राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा गुरुवारी साखरपुडा होणार असल्याच्या चर्चा आहेत. तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्या ट्वीटनंतर लालूंच्या घरात शहनाई वाजणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरणार आहेत, असं म्हटलं जातंय. “घरी भावाचं लग्न होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे,” असं रोहिणी यांनी ट्वीट करून म्हटलंय. दरम्यान तेजस्वी यादव ज्या मुलीशी साखरपुडा करणार आहेत, तिची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

तेजस्वी यादव साखरपुडा करून नवीन जीवनास सुरुवात करणार असले तरी ते तरुणींमध्ये फार लोकप्रिय आहेत. तुम्हाला माहितीये का तेजस्वी यादव यांना २०१६मध्ये व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर तब्बल ४४ हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते. त्यावेळी तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे ज्या हेल्पलाइवर लग्नाचे प्रस्ताव आले ती हेल्पलाइन रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तक्रारींसाठी जारी करण्यात आली होती. परंतु त्यावर तक्रारींऐवजी लग्नाच्या प्रस्तावांचा पूर आला होता.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हेल्पलाइनवर आलेल्या ४७ हजार मेसेजपैकी केवळ ३ हजार तक्रारी आणि रस्ते दुरुस्तीच्या मागण्या होत्या. तर उर्वरित ४४ हजार मेसेज हे तेजस्वी यादव यांना लग्नाची मागणी घालणारे होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीचे लग्न दिल्लीत होणार आहे. या लग्नाला संपूर्ण लालू कुटुंबासह जवळपास ५० लोक उपस्थित राहणार आहेत. लालू प्रसाद यादव यांना ७ मुली आणि दोन मुलं आहेत. या सर्वांमध्ये तेजस्वी यादव सर्वात लहान आहे.