VD Savarkar Kerala Quiz Controversy Independence Day competition: केरळमधील एका शालेय प्रश्नमंजुषेतील प्रश्नावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. ब्रिटिशांकडून कोणत्या स्वातंत्र्यसैनिकास कठोर शिक्षा देण्यात आली होती, असा प्रश्न या प्रश्नमंजुषेत विचारला गेला. ज्याचे उत्तर विनायक दामोदर सावरकर असे देण्यात आले होते. केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम आणि कुंबला उप-जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त ६ ऑगस्ट रोजी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ब्रिटिशांकडून सर्वात कठोर शिक्षा मिळाली, असे स्वातंत्र्यसैनिक कोण होते?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचे उत्तर विनायक दामोदर सावरकर असे देण्यात आले होते.

विरोधकांनी प्रश्नमंजुषेतील या प्रश्नावर आता आक्षेप घेतला आहे. संघ परिवाराने स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला नव्हता, मात्र प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने त्यांचे उदात्तीकरण करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच सामान्य शिक्षण मंत्री एन. शमसुद्दीन यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही प्रश्नमंजुषा कोणी तयार केली आणि आयोजित केली, याचा शोध घेऊन जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी सामान्य शिक्षण संचालकांना दिले आहेत.

प्रश्नमंजुषा अधिकृत नव्हती

मंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रश्नमंजुषा सोशल सायन्स क्लब किंवा सामान्य शिक्षण विभाग यांच्यापैकी कुणाच्याही अधिकृत उपक्रमाच्या यादीत नव्हती. तसेच प्रश्नमंजुषेतील प्रश्न ठरविण्यात या दोन्ही विभागांचा कोणताही सहभाग नव्हता. “ज्या व्यक्तीने ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा प्रश्न तयार केला, तिचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित आहे”, असा आरोप मंत्र्यांच्या कार्यालयाने केला आहे. यासाठी जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल सायन्स क्लबमधील काही शिक्षकांनी ही प्रश्नावली तयार केली होती.

प्रश्नमंजुषेच्या वादानंतर सीपीआय (एम) आणि डाव्यांशी संलग्न असलेल्या विद्यार्थी आणि युवा संघटनांकडून टीका होत आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस नेतृत्वाखालील यूडीएफ सरकारकडून संघ परिवाराचा अजेंडा शिक्षण व्यवस्थेत घुसवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संघाशी साटेलोटे असल्याचा पिनराई विजयन यांचा आरोप

सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसप्रणीत यूडीएफ सरकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी साटेलोटे असल्याचा आरोप केला. सावरकरांचा इतिहास लादून त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, असाही दावा त्यांनी केला.

कन्नूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना पिनराई विजयन म्हणाले की, केंद्र सरकार आणि आरएसएस हे इतिहासाचे पुनर्लेखण करत आहेत. हा प्रयत्न म्हणजे केरळमध्ये केंद्र सरकारचे नवीन शिक्षण धोरण लागू करण्याचा प्रयत्न आहे, असाही आरोप त्यांनी केला.

माजी शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनीही प्रश्नमंजुषेतील प्रश्नावर टीका केली. केरळच्या शिक्षण विभागाचे भगवेकरण करण्याचा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.