सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असल्यामुळे उद्योगधंदेही ठप्प आहेत. तर अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी करोना व्हायरस आणि अर्थव्यवस्थेपुढील संकटाचा कसा सामना करावा याबाबत माहिती दिली आहे. करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी झोनबाबतही विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. तर अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरू करतेवेळी आपल्याला पुरवठा व्यवस्थेच्या साखळीवर काम केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी म्हणजेच १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही सुटही देण्यात आली आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी राहुल गांधी यांनी पुरवठा व्यवस्थेच्या साखळीवर काम करण्याचा सल्ला सरकारला दिला.

यावरून भाजपानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला. “केवळ चर्चेत राहण्यासाठी कोणतीही वक्तव्य करणं योग्य नाही. यापेक्षा राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील जबाबदार नेते म्हणून भूमिका पार पाडायला हवी. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी कोणत्याही अर्थतज्ञ्जांशी चर्चा केली नाही. परंतु आता रघुराम राजन, अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून जे काही सुचवत आहे ते यापूर्वीपासूनच सरकारच्या विचाराधीन आहे,” अशा शब्दात भाजपा नेते शाहनवाझ हुसैन यांनी त्यांच्यावर टीका केली.

अभिजीत बॅनर्जींनशी चर्चा

“करोनामुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी देशातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाच्या हातात पैसै पोहोचणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने एक यंत्रणा राबवण्याची गरज आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत आर्थिक मदत पोहोचवेल आणि त्यानंतर ही मदत गरीबांपर्यंत पोहोचवली जाईल.” असं बॅनर्जी म्हणाले. तसंच यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नसलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणं सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. स्थलांतरित कामगारांसारख्या लोकसंख्येसाठी अशी कोणतीही सुरक्षित योजना नसल्याचंही अभिजीत बॅनर्जी राहुल गांधीबरोबर केलेल्या चर्चेदरम्यान म्हणाले होते.