Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलयी सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये शुक्रवारी मारला गेला. याह्या सिनवारला इस्रायलच्या सैन्याने ठार केल्यानंतर त्या घटनेचा एक व्हिडीओ इस्रायलच्या लष्कराकडून शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये याह्या सिनवार (Yahya Sinwar) गंभीर जखमी अवस्थेत एका उद्ध्वस्त घरात हातानिशी बसल्याचं दिसला होता. त्याला ठार करण्याच्या काही क्षण आधीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला ठार करण्यात आलं.

आता याह्या सिनवार आणि त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडीओ इस्रायलकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये याह्या सिनवार आपल्या मुलांसह आणि पत्नीसह त्यांच्या घराच्या खाली असलेल्या बोगद्यात फिरताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्या बोगद्यात याह्या सिनवार दीर्घ मुक्काम करण्याच्या तयारीत होता, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये याह्या सिनवार आणि त्याची पत्नी काही वस्तू आणि पुरवठा घेऊन जात असल्याचे दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये याह्या सिनवारच्या पत्नीकडे २७ लाख रुपये किमतीची हर्मीसची आलिशान हँडबॅग दिसून आली आहे.

हेही वाचा : Yazidi Women: “लहान बाळाचं मांस खावं लागलं, त्याची चव…”, इसिसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव

इस्रायली सैन्याने जारी केलेल्या व्हिडीओत ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी याह्या सिनवार हा लपत असल्याचे दाखवले आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या आधी याह्या सिनवार हा त्याच्या पत्नी आणि मुलांसह एका भूमिगत बोगद्यातून चालताना आणि नंतर आयएफडीला सापडलेल्या बंकरमध्ये काही साहित्याच्या पिशव्या घेऊन जात असल्याचे म्हटले आहे.

याह्या सिनवार ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड!

इस्रायलच्या हद्दीत गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून प्रवेश करत बेफाम कत्तल केली होती. घराघरात घुसून इस्रायली नागरिकांना ठार केलं होतं. प्रचंड दहशत निर्माण केली. रस्त्यावर मृतदेहांची जाहीर विटंबनाही केली. याह्या सिनवार हा याच हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्यामुळे त्याचा मृत्यू हा हमाससाठी मोठा धक्का मानला जातो.

याह्या अचानक सापडला आणि मारला गेला!

हमासचा म्होरक्या इतक्या सहज हाती लागेल याची इस्रायली लष्कराला कल्पनाही नव्हती. तो कुठे आहे याचा ठावठिकाणा लष्कराला माहिती नव्हता. त्याबाबत कोणतीही गुप्तचर यंत्रणेची माहिती लष्कराकडे नव्हती. नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असणाऱ्या पथकाला तो त्या घरात दिसला आणि त्याचा खात्मा करण्यात आला. पेट्रोलिंगच्या पथकाला हमासचे तीन दहशतवादी दिसले. त्यातच याह्या एक होता. चकमकीदरम्यान याह्यानं एका इमारतीमध्ये आसरा घेतला. पण तिथे इस्रायलचे ड्रोन पोहोचले आणि त्याला ठार करण्यात आलं.

Story img Loader